जळगाव लाईव्ह न्यूज । पाळधी ते तरसोददरम्यानच्या बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना न केल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले. या घटनेनंतर जळगाव तालुका पोलिसांनी दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या जबाबदार संचालकांसह साइट अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

इंदूर येथील अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीने पाळधी ते तरसोददरम्यानच्या बायपाससह रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम केले आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये हे काम पूर्ण झाले होते. करारानुसार पुढील तीन वर्षे या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंपनीवर आहे. मात्र, पहिल्याच पावसाळ्यात रेल्वे उड्डाणपुलाचा भराव खचल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीच्या काळात बायपासच्या एका बाजूची वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे वाहनचालकांना दुरुस्तीच्या ठिकाणाची पूर्वकल्पना मिळावी, यासाठी सूचना फलक, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर, ब्लिंकर्स तसेच रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षकांची व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांच्या फिर्यादीनुसार या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाय करण्यात आले नसल्याचा आरोप आहे.

रात्रीच्या अंधारात दुरुस्तीचे ठिकाण न दिसल्याने धोका अधिक वाढला. रविवारी मध्यरात्रीनंतर दुरुस्ती सुरू असलेल्या लेनमध्ये ट्रक आणि मोटारीची जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारीतील शांताराम केशव पाटील (५८, रा. शिंदखेडा) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात रामचंद्र ईश्वर महाजन यांच्यासह अन्य चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून दुरुस्तीच्या ठिकाणी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. महामार्गावर काम सुरू असताना वाहतूक सुरू ठेवण्यात आली असल्यास वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य सूचना देणे आणि वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे बंधनकारक असते. मात्र, या ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिस अंमलदार अजय भोंबे यांच्या फिर्यादीवरून अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंघल, जी. एम. दत्ता आणि संबंधित साइट अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम १०५, २९०, ३(५), मोटार वाहन कायदा कलम १९८-अ तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास जळगाव तालुका पोलिसांकडून सुरू आहे.







