जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यात जुन्या वादातून गुन्हेगारी वाढताना दिसत असून जुन्या भांडणांचा राग मनात धरून लोक एकमेकांवर हल्ले करत आहेत किंवा खुनासारखे गंभीर गुन्हे करत आहेत. आता याच दरम्यान ज्यात जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करत एका तरुणाची हत्या झाल्याची घटना जळगाव शहरातील जोशी कॉलनीत घडली. धीरज दत्ता हिवराळे असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कल्पेश वसंत चौधरी असं मारेकऱ्याचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज हिवराळे आणि कल्पेश चौधरी यांच्यात पूर्वीपासून वैमनस्य होते. रविवारी दुपारी नवीन जोशी कॉलनीत दोघे समोरासमोर आले. त्याच्यात पुन्हा नव्याने वाद झाला. मात्र यावेळी त्यांच्या वादानं भयाण रुप घेतलं होतं. त्यांच्या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झालं.

दोघांनीही धारदार शस्त्राने एकमेकांवर वार केले. या हल्ल्यात धीरज याच्या छातीत खोलवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तेथील स्थानिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर कल्पेश चौधरी याच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा जिल्हा रुग्णालयात तैनात करण्यात आला आहे. घटनेची माहिती कळताच नातेवाईक आणि मित्रांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला होता.









