⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

तुम्हाला डायबेटिस नाही ना? जाणून घ्या ही आहेत लक्षणे

डॉ.तुषार पाटील, मधुमेह तज्ञ
(डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल)

मधुमेह (डायबेटिस) हा शब्द आता बहुतेक सर्वांच्या ओळखीचा झालेला आहे. बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि अयोग्य आहारांमुळे मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या दिसून येते. आपल्या भारत देशात मधुमेहींची संख्या खूप जास्त आहे. त्यातल्या त्यात टाइप-१ आणि टाइप-२ या श्रेणीतील रुग्ण तर झपाट्याने वाढत आहेत. आपल्यालाही कधीतरी डायबेटिस होईल अशी भीती अनेक जणांना वाटत असेल. त्यामुळे मधुमेह कशामुळे होतो, त्याची लक्षणे व डायबिटीस वरील उपचार, डायबेटिस होण्याआधीच त्याला रोखण्यासाठी काय प्रयत्न करायचे याची माहिती डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे मधुमेह तज्ञ डॉ.तुषार पाटील यांनी दिली आहे.

मधुमेह किंवा डायबेटीसमध्ये शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही किंवा इन्सुलिनचा वापर करण्यासाठीची यंत्रणा असमर्थ ठरते. यामुळे मधुमेहात रक्तातील साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण वाढते. हा विषय अजून सोप्या भाषेत समजून घ्यायचा असल्यास, आपल्या शरीरात पेंक्रीयाझ नावाची एक ग्रंथी असते. यातून इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होत असतं. हेच इन्सुलिन आपली शरीरातील रक्तात तयार होणार्‍या ग्लुकोज वा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. पण शारीरिक बदलासह पेंक्रीयाझ इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखरेचा स्तर वाढत जातो. शेवटी तो मनुष्य मधुमेहला बळी पडतो.

मधुमेहाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.
(१) टाईप-१ मधुमेह
(२) टाईप-२ मधुमेह
(३) गरोदरपणातील मधुमेह

टाईप-१ मधुमेह :
हा मधुमेह प्रकार जास्त धोकादायक असून टाईप-१ मधुमेह प्रकारचे रुग्ण कधीही डायबेटीस पासून बरे होत नाहीत. त्यांच्या शरीरात योग्य प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती होत नाही. यासाठी त्यांना नेहमी बाहेरून इन्सुलिन इंजेक्शन घेणे गरजेचे असते.

टाईप-२ मधुमेह :
अयोग्य आहार, बैठी जीवनशैली यामुळे वजन जास्त प्रमाणात वाढल्याने इन्सुलिन निर्मितीवर परिणाम झाल्याने टाईप-२ मधुमेह होतो. टाईप-२ मधुमेह रुग्ण हे योग्य आहार आणि नियमित व्यायाम या उपायांनी मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतात. तसेच त्यांना गोळ्यांची किंवा इन्सुलिनचीही गरज भासू शकते.

गरोदरपणातील मधुमेह :
प्रेग्नन्सीमध्ये अनेक स्त्रियांना रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास ह्या प्रकारचा मधुमेह होत असतो. यावर इन्सुलिन इंजेक्शनद्वारे नियंत्रण ठेवले जाते. गरोदरपणात मधुमेह झालेल्या साधारण ८०% स्त्रियांची ग्लुकोज लेव्हल बाळाच्या जन्मासोबत नॉर्मलला येते. तर काही स्त्रियांमध्ये डिलिव्हरीनंतरही मधुमेह राहू शकतो.

प्री-डायबेटिस
कोणत्याही लक्षणाशिवाय डायबेटीस आपल्या शरीरात छुपलेला असतो. रक्तातील साखरेची तपासणी केल्यास ती टाईप-२ डायबेटीस पेक्षा थोडी कमी असते. तेंव्हा त्या अवस्थेस झीशवळरलशींशी असे म्हणतात. ही अवस्था म्हणजे धोक्याची एक घंटाच असून या अवस्थेत योग्य आहार व नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. मात्र जर प्री-डायबेटिस असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यास किंवा योग्य आहार व व्यायाम न केल्यास टाईप-२ प्रकारचा डायबेटीस होतो.

डायबेटिस का होतो?
जेव्हा अन्नाचं पचन होतं. तेव्हा त्याचं रुपांतर ग्लुकोजमध्ये होऊन ते रक्तप्रवाहात जात असतं. इन्शुलिन ग्लुकोजला रक्तात, पेशींपर्यंत पोहोचवत असतं. तिथं त्याचं ऊर्जेत रुपांतर होत असतं. परंतु डायबेटिस झाला असल्यास शरीराला ग्लुकोजचं ऊर्जेत रूपांतर करता येत नाही. कारण ग्लुकोज वहनासाठी योग्य प्रमाणात इन्शुलिन नसतं किंवा इन्शुलिन योग्यप्रकारे काम करत नसतं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मधुमेहाचं निदान म्हणजे, स्वादुपिंडाची इन्शुलीन तयार करण्याची क्षमता ५० टक्के कमी झालेली असते. उरलेली ५० टक्के क्षमता मधुमेह नियंत्रण आणि जीवनशैलीमधील बदल यावर अवलंबून असते.

डायबेटिसची लक्षणे :

भरपूर तहान लागणे
वारंवार लघवीला जावे लागणे
खूप थकवा जाणवणे
अचानकपणे वजन घटणे
अशक्तपणा, चक्कर येणे
अधिक भूक लागणे
हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे
डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे
मुत्रमार्गाजवळ खाज सुटणं
जखमा लवकर न भरणं
दृष्टी कमकुवत होणं

डायबेटीसमुळे होणारे दुष्परिणाम :

  • वाढलेली रक्तातील साखर ही प्रत्येक अवयवापर्यंत जाते. म्हणून शरिरातील प्रत्येक अवयवाला वाढलेल्या साखरेचा दुष्परिणाम होतो.
  • किडनीवरील परिणाम (डायबेटिक नेफ्रोपॅथिक) – मधुमेहावर नियंत्रण व योग्य उपचार न झाल्यास किडनीच्या कार्यावर विपरित परिणाम होतो. यामुळे किडनी निकामी होवून डायलेसिस किंवा किडनी ट्रान्सप्लान्टची गरज निर्माण होते.
  • हृदय आणि मेंदूवरील परिणाम – हृदयविकार आणि पक्षाघात होण्याची शक्यता असते. मधुमेह वाढल्यास धमन्या किंवा रक्तवाहिन्यांचा भिंती जाड होतात व कडक होताता. परिणामी रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. उच्च रक्तदाबाच्या समस्याही वाढतात.
  • डायबेटिक रेटिनोपॅथी – मधुमेहामुळे डोळ्यांवर विविध गंभीर परिणाम उद्भवू शकतात. उदा.दृष्टीपटलावर बहुतांश मधमुहे रुग्णांमध्ये १५ वर्षानंतर परिणाम होवू शकतो. डोळ्यांसमोर अंधार येणे, अस्पष्ट दिसणे, डोकेदुखी, चष्म्याचा नंबर वारंवार बदलणे, दृष्टी कमजोर होणे, ही सर्व लक्षणे डायबेटिक रेटिनोपॅथीची आहे. परिणामी मोतिबिदूं व काचबिंदू चे विकार होवू शकतात.
  • डायबेटिक न्यूरोपॅथी – मधुमेहाच्या दृष्परिणामांमुळे मज्जातंतू प्रभावित होतात. त्यामुळे स्नायूंची ताकत कमी होते. हातापायात बधिरपणा, संवेदना कमी होणे, मुंग्या येणे, वेदना होणे, मूत्र विसर्जनावर नियंत्रण राहत नाही. संवेदना कमी झाल्यामुळे डायबेटिक फूट/पायांना जखमा होवू शकतात.

मधुमेह आणि त्यावरील उपचार :

योग्य आहार, व्यायाम आणि योग्य औषधोपचारामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यासाठी मधुमेही रुग्णांनी त्यांचे आहार, व्यायाम आणि उपचारांचे नियोजन पुढीलप्रमाणे ठेवावे.

१) दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करा.
२) रात्री पुरेशी झोप घ्यावी. दुपारी झोपणे टाळा.
३) सततची बैठी जीवनशैली टाळा.
४) मानसिक ताणतणावापासून दूर राहावे यासाठी प्राणायाम, ध्यान-धारणा करू शकता.
५) धूम्रपान, सिगारेट, तंबाखू, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहा.
६) मधुमेह तज्ज्ञ डॉक्टरांकडूनचं उपचार करून घ्या.
७) स्वतःच्या स्वतः किंवा ऐकीव माहितीवर घरगुती उपाय करु नका.
८) नियमित ब्लड शुगरची तपासणी करुन घ्या.

डायबेटीसचे असे करतात निदान :
मधुमेहाचे निदान करण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण फास्टिंग शुगर टेस्ट किंवा पीपी शुगर टेस्टद्वारे तपासले जाते.

फास्टिंग शुगर टेस्ट : ही चाचणी उपाशीपोटी केली जाते.

नॉर्मल प्रमाण – ७० ते ९९ mg/dL पर्यंत.
प्री-डायबेटीस अवस्था – १०० ते १२६ mg/dL पर्यंत.
मधुमेहाचे निदान – ब्लड शुगर १२६ mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेह असल्याचे निदान होते.

पीपी शुगर टेस्ट : ही चाचणी जेवणानंतर केली जाते.

नॉर्मल प्रमाण – १४० mg/dL च्या आत असणे.
प्री-डायबेटीस अवस्था – १४० ते २०० mg/dL पर्यंत.
मधुमेहाचे निदान – ब्लड शुगर २०० mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेहाचे निदान होते.

अधिक माहितीसाठी तुम्ही डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे मधुमेह तज्ञ डॉ.तुषार पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता.