जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त विविध उपक्रमांनी युक्त कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. फोटोग्राफी क्षेत्रातील छायाचित्रकारांना एकत्र आणून त्यांच्या कला व कौशल्याला प्रोत्साहन देणे, तसेच आधुनिक फोटोग्राफी आणि फोटो एडिटिंगच्या माध्यमातून या क्षेत्रात होत असलेल्या बदलांची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून ऋषी जैन सर यांनी फोटो एडिटिंग विषयी आधुनिक टूल्स चा वापर करून किती छान प्रकारे एडिटिंग करून आपला व्यवसाय वाढवता येऊ शकतो याविषयी सर्व फोटोग्राफर मित्रांना मार्गदर्शन केले

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. फोटोग्राफी क्षेत्राचे प्रतीक असलेल्या कॅमेऱ्याचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ऋषी जैन सर, विनोद चौधरी, योगेश शर्मा, अनिल पाटील आणि गुणवंत गलवाडे हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अभय रावते होते. सूत्रसंचालन कुणाल जोगी यांनी केले तसेच यावल तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष हेमराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संघटनेचे विविध पदाधिकारी आणि सदस्य ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी फोटोग्राफी क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, आधुनिक कॅमेरा तंत्रज्ञान, फोटो एडिटिंग तसेच भविष्यातील फोटोग्राफीच्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमामुळे तालुक्यातील फोटोग्राफरमध्ये नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासोबतच संघटितपणे काम करण्यासाठी उत्साह निर्माण झाला.
जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यावल तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. नवीन कार्यकारिणीमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नितीन कोळी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.












