जळगावच्या दोन तरुण उद्योजकांचा अनोखा आदर्श; वाढदिवसाचा खर्च टाळून समाजकार्यासाठी दिले १.७१ लाख रुपये

जून 14, 2026 7:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमधील तरुण उद्योजकांनी आपल्या वाढदिवसाचा बडेजाव आणि वायफळ खर्च टाळून सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श पायंडा पाडला आहे. सध्याच्या काळात वाढदिवसानिमित्त फ्लेक्स-बॅनर्स, डीजे, महागडे केक आणि पार्ट्यांवर हजारो-लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याची जणू स्पर्धाच सुरू असते. मात्र, या सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देत अयांश ऑटोचे संचालक यश सुनील मंत्री आणि युवा उद्योजक अमोल कासट यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘जीपीएस मित्र परिवार’ या संस्थेला मोठी आर्थिक मदत केली आहे. यश सुनील मंत्री यांनी ७१ हजार रुपये आणि अमोल कासट यांनी १ लाख रुपये, अशी एकूण १ लाख ७१ हजार रुपयांची भरीव मदत संस्थेचे सर्वेसर्वा तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.

sunil mantri amol kasat

वाढदिवसाचा खर्च टाळून केलेली ही मदत म्हणजे केवळ पैशांची बचत नसून खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन आहे. अनावश्यक पार्ट्या आणि दिखाव्यापेक्षा अनाथालय, वृद्धाश्रम किंवा गरजू विद्यार्थ्यांना मदत केल्याने मिळणारा आनंद आणि समाधान हे चिरंतन असते, अशी भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली. या वाचवलेल्या निधीतून आणि ‘जीपीएस मित्र परिवारा’च्या माध्यमातून आगामी काळात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, शालेय साहित्य देणे आणि त्यांची शैक्षणिक फी भरून मदत करणे समाविष्ट आहे. यासोबतच अनाथाश्रमातील मुलांना अन्नधान्य व कपडे वाटप करणे, वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठांसोबत वेळ घालवून त्यांचा आनंद द्विगुणित करणे, वाढदिवसाच्या दिवशी वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संवर्धन करणे, आणि रक्तदान व मोफत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गरजूंना जीवनदान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाणार आहे.

आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करत सामाजिक कार्याला एवढा मोठा हातभार लावल्याबद्दल यश सुनील मंत्री आणि अमोल कासट यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या अनोख्या उपक्रमामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांना मोठा आधार मिळाला असून इतरांसाठीही हा एक नवा आदर्श ठरला आहे. ‘जीपीएस मित्र परिवार’ संस्थेच्या वतीने दोन्ही युवा उद्योजकांना वाढदिवसाच्या आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now