⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

विश्व आदिवासी गौरव दिन : ..चला समजून घेऊ, खान्देशातील निसर्ग पुजारी, कुटुंबवत्सल आदिवासी समाजाला!

जळगाव लाईव्ह न्यूज । सायसिंग पाडवी । आदिवासी समुदाय हा अतिप्राचीन मूळ भारतीय समाज आहे. एकेकाळी भारतीय जल, जंगल जमीनीचा मालक असणारा हा समाज इंग्रजांच्या आर्थिक शोषणामुळे दुर्बल बनला, हा समाज देशाच्या नव्हे जगाच्या पाठीवर आजही निसर्गाचे पुजारी मानला जातो. या समुदायाची जीवनशैली ही त्या त्या प्रदेशातील आहे. खान्देश महाराष्ट्रातील आदिवासी समुदायाचे देखील अनोखे वैशिष्ट्य आहेत. असे म्हटले जाते की, ब्रिटिशांना त्यांच्या जंगलातून उत्पन्न खास साग हवा होता, म्हणून त्यांनी फॉरेस्ट खाते तयार केले आणि या लोकांना हक्क नाकारला, त्यांना चोर ठरवले. तेव्हापासून ते लोक मुख्य प्रवाहापासून दूर फेकले गेले. आजही जंगल खात्याचा कारभार त्याच खात्याने चालतो. पण काही भागात लोकांनी आपले हक्क लढा देऊन मिळवले आहेत. आज दि.९ ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव (World Adivasi Pride Day) दिनानिमित्त हा खास लेख..!

खान्देशात (नंदुरबार, जळगाव, धुळे) या जिल्ह्यात भिल्ल, कोकणी, पावरा, गावीत या जमातीचे लोक रहिवास करून आहेत. एका जर्मन अर्थशास्त्रज्ञाने म्हटले आहे की, आदिवासी (Tribal Community) प्राक्-आर्थिक स्थितीत आहेत, स्वतःपुरते अन्न गोळा करावयाचे, हाच एक आर्थिक व्यवसाय या समाजात आहे. हे म्हणणे बरोबर नाही. अन्नाचा प्रश्न आदिवासी समाजात सामाजिक प्रश्न समजला जातो व त्याप्रमाणे तो हाताळला जातो. कौटुंबिक जबाबदाऱ्या, नातेसंबंध, शेजारधर्म, वडिलांचा व मुखियांचा मान, कुळींचे आचारधर्म, निषेध नियम, पूर्वज व देवता या सर्वांचाच विचार आर्थिक व्यवस्थेत केला जातो.

कामाकरिता काम किंवा पैशांकरिता काम, असा व्यवहार आदिवासी समाजात नसतो. ज्या व्यक्तीचे काम असेल, त्यास कामात मदत करणे इतरांचे कर्तव्य ठरते. किती वेळ काम केले, यावरून मोबदला ठरविण्यात येत नाही; कारण सर्वसाधारणपणे आदिवासी समाजात वेळेस विशेष महत्त्व नसते. आदिवासी आळशी असतात असे नाही, तर ते गरजेनुसार काम करतात येवढेच. अन्न, वस्त्र, व निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठीच त्यांचे आर्थिक व्यवहार होतात. सगेसोयरे व पूर्वज यांचा मान, आतिथ्य, दीक्षाविधी, विवाह, सामाजिक दर्जाचे दिग्दर्शन यांसारख्या इतर गोष्टींनीही आदिवासींचे आर्थिक व्यवहार प्रेरित केले जातात.
हे देखील वाचा : आगळावेगळी विवाह परंपरा : ‘वर’ पक्ष हुंड्यात देतो ९ ग्लास दारू, धान्य, रोख ५१ हजार ४९ रुपये

आदिवासी समाजात कुटुंब हा मानव समाजातील सर्वात महत्त्वाचा नातेगट असतो. सर्व नातेसंबंधांस कुटुंबापासून सुरुवात होते. कुटुंब द्विपक्षीय नातेसमूह असतो. आई व वडील या दोघांच्या नातेवाईकांशी व्यक्तीचा संबंध येतो. समाज पितृनामी, पितृसत्ताक, पितृनिवासी, पितृवंशी किंवा मातृनामी, मातृसत्ताक, मातृनिवासी, मातृवंशी असतो. याचा अर्थ पितृवंशी समाजात व्यक्तीचा मातृसंबंधीयांशी नातेव्यवहार राहत नाहीत, असे नाही. रोजच्या व्यवहारात व समारंभात दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांचा संबंध येतो.

प्रत्येक गावात शिवार देवाची पूजा (निलपी), दिवाळी व होळी सण साजरे केले जातात. परंतु, निरनिराळ्या गावांची दिवाळी निरनिराळ्या दिवशी करतात. दिवाळीस सकाळी देवाची पूजा करून त्यास मांसाहार देण्यात येते, तसेच गाव जेवण असते. पुजारी व मांत्रिक या दोन भिन्न व्यक्ती असतात. मांत्रिक चेटूक काढणे, रोगांवर औषधे देणे इ. बाबतींत मदत करतो. बहुतेक पुजारी व मांत्रिक हे स्वतःचा शेतीव्यवसाय सांभाळून काम करतात.
हे देखील वाचा : ‘उलगुलान ते बिरसायत’चा इतिहास रचणारे दैवत ‘धरती आबा’

जमातीत गावप्रमुखही असतो. ही सर्व पदे वंशपरंपरागत असतात. खान्देश महाराष्ट्रातील भिल्ल, पावरा, गावित या जमातींत नृत्यगीते, विवाहगीते, शिकारीची गाणी, शोकगीते, शेतकऱ्यांची गाणी, अंगाई गीते इ. लोकगीतांचे प्रकार आहेत. त्याशिवाय उखाणे, म्हणी यांचे अलिखित लोकसाहित्य बरेच आहे. या परंपरेचा ठेवा एक पिढी दुसऱ्या पिढीस सुपूर्द करतात. आदिवासी समुदायाचे जग हे एक वेगळे जग आहे. ताण, स्पर्धा, मत्सर, विकार, पैसा, तांत्रिक विकास, भय, अगतिकता, संताप, विकृत स्वार्थ अश्या अनेक दुर्गंधीयुक्त घटकांनी गच्च भरलेल्या ज्या उकिरड्यात इतर लोक राहतात. त्याच उकिरड्याच्या काठाला लागून या समुदायाचा जग आहे.