जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२३ । राज्यातील महिलावर्गासाठी आनंददायक बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारने महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास सवलतीची घोषणात राज्याच्या अर्थसंकल्पात केल्यानंतर शुक्रवार, 17 पासून अर्ध्या तिकीटाची सवलत सरू झाल्याने महिलावर्गात आनंद पसरला आहे.
एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान, राज्याच्या वाहतुकीसाठीच ही सवलत लागू असून शहरी वाहतुकीचा त्यात समावेश नसल्याचे परीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते.