जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहातील निमखेडी रोडवरील कुंटणखान्यावर टाकण्यात आलेल्या छाप्यानंतर आता तपासात अत्यंत धक्कादायक आणि मोठी माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला चक्क बांगलादेशी नागरिक असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या परदेशी महिलेने बनावट भारतीय ओळखपत्राचा वापर करून जळगावात वास्तव्य केल्याचे उघड झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
याबाबत असे की, निमखेडी रोडवरील ‘ब्रम्हांडनायक अपार्टमेंट’ येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर जळगाव पोलिसांनी २१ मे २०२६ रोजी छापा टाकला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ (कलम ३, ४, ५, ६) अन्वये गुन्हा (CRN-151/26) दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी संशयित आरोपी सागर सोनवणे (रा. धरणगाव) आणि सीमा उर्फ कविता मोरे (रा. जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून दोन पीडित महिलांची सुटका केली होती. या महिलांना पुढील पुनर्वसनासाठी आशादीप संस्थेत दाखल करण्यात आले होते.

‘पोलिस अँगल’ने चौकशी अन् बांगलादेशी कनेक्शन उघड
सुटका करण्यात आलेल्या महिलांची पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली असता, एका महिलेच्या हालचाली आणि माहिती संशयास्पद वाटली. सुरुवातीला या महिलेने पोलिसांना खरी माहिती देण्यास कमालीची टाळाटाळ केली आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तपास कौशल्य वापरत ‘पोलिस अँगल’ने कसून विचारपूस केली.
संशय बळावल्याने पोलिसांनी तात्काळ तिचा मोबाईल जप्त करून त्याची तपासणी केली. तसेच तिची बायोमेट्रिक पडताळणी केली असता, तिने सादर केलेले आधार कार्ड पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले. अधिक तपासात ही महिला मूळची बांगलादेशातील ‘खुलना’ येथील असून तिचे नाव जाकिया अबुल काहेर फोकर (वय २८) असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस तपास सुरू
एका गंभीर गुन्ह्याच्या तपासादरम्यान थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि बनावट भारतीय ओळखपत्राचे रॅकेट समोर आल्याने जळगाव पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे. ही बांगलादेशी महिला भारतात आणि विशेषतः जळगावात कधी व कोणाच्या मदतीने आली? यामागे मानवी तस्करी करणारी मोठी टोळी सक्रिय आहे का? याबाबत जळगाव तालुका पोलीस आता पुढील सखोल तपास करत आहेत.








