जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२४ । घरभरणीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला बसने धडक दिली. यात महिला बसच्या चाकाखाली आल्याने चिरडून ठार झाली. ही घटना रावेरनजीक बालाजी टोलनाक्यानजीक सोमवारी सायंकाळी घडली. आरती संदीप पाटील (३२, रा. आमोदा, ता यावल) असेमृत महिलचे नाव आहे.
याप्रकरणी बसचालकावर रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरगाव खुर्द (ता. रावेर) येथील जितेंद्र जगन्नाथ पाटील यांच्या कन्येचा शहापूर (मध्यप्रदेश) येथे विवाह झाला. सोमवारी घरभरणीचा कार्यक्रम आटोपून संदीप सीताराम पाटील व आरती पाटील हे दाम्पत्य मोटारसायकलने (एम. एच. १४/ए क्यू ११९६) आमोदा येथे जात असताना रावेरनजीक बालाजी टोलनाक्यासमोर भरधाव अहिरवाडी – रावेर या बस ( एम.एच.१४ /बी. टी. ३९१६) वरील चालक शेख तौसीफ शेख रफीक यांचा ताबा सुटल्याने जबर धडक दिली.
यात आरती पाटील खाली पडल्याने त्यांच्या अंगावरून बस गेली. तामसवाडीचे उपसरपंच साजन चौधरी व रुग्णवाहिका चालक वासुदेव महाजन यांच्यासह काही तरुणांनी गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात आणले. त्यावेळी डॉ योगेश पाटील यांनी मृत घोषित केले.