जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी रात्री माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तब्बल 18 तास आंदोलन केल्यानंतर शिंदे सरकारने मात्र गुरुवारी रात्री खडसेंना पुरवण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा काढून घेतली होती. या अनुषंगाने खडसेंशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझी सुरक्षा हटवली मात्र 50 खोके घेणार्यांची सुरक्षा कधी हटवणार? हा तर सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
आमदार खडसे म्हणाले की, वास्तविक मी सरकारकडे सुरक्षा पुरवा, अशी मागणी केली नव्हती मात्र पाकिस्तान, युएई, दुबईमधून धमक्या येत होत्या, त्याची शहानिशा पोलिसांनी केल्यानंतर सरकारने स्वतःहून 1991 पासून सुरक्षा पुरवली होती मात्र आंदोलन केल्याने आपली सुरक्षा काढून घेण्यात आली, हरकत नाही मात्र 50 खोक्यांवाल्यांचे काय ? त्यांची सुरक्षा सरकार काढणार का ? असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला.
नाथाभाऊला छळण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून सरकारविरोधात कुणीही बोलायला नको म्हणून हा सर्व प्रकार सुरू आहे. आमच्याविरोधात बोलले तर कारवाई करू, तर गुन्हा दाखल करणार नाही, असा प्रकार सुरू असून अत्यंत खालच्या स्तरावर राजकारण जात असल्याचे खडसे म्हणाले. जळगाव जिल्हा दूध संघाबाबत शनिवारी न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जळगाव दूध संघाच्या गैरव्यवहारावरून जळगावातील राजकीय वातावरण तापले आहे. जळगाव दूध संघात सुमारे दीड कोटींच्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आमदार एकनाथराव खडसे यांनी जळगाव शहर पोलिसांकडे केली मात्र दखल न घेतल्याने गुरुवारी आंदोलन करण्यात आले व गुन्हा दाखल करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा खडसेंनी घेतल्याने राज्यात खळबळ उडाली होती. खडसेंची प्रकृती बिघडल्याने पोलिस स्टेशनच्या आवारातच त्यांची रक्तदाब तपासणी करण्यात आली.
खडसेंनी पोलिस ठाण्यातच आंदोलन केले व गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा घेतला होता. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीनंतर व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बंदद्वार चर्चेनंतर एकनाथराव खडसेंनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.