जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महापालिकेचे पडघम वाजले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी महायुतीमधील घटक पक्ष भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने युतीची घोषणा केली होती. मात्र यात राष्ट्रवादी अजित पवार गटाबाबत संभ्रम होता. अशातच भाजप आणि अजित पवार गटाच्या नेत्यांची गोपनीय बैठक पार पडली असून यामध्ये महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढवण्यावर अंतिम ‘शिक्कामोर्तब’ करण्यात आले. जळगाव महानगरपालिकेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे. जागावाटपाचा तिढा देखील सुटल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

महापालिकामध्ये महायुती होणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, आजच्या बैठकीने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या हाय-प्रोफाईल बैठकीला भाजप आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे आणि जिल्ह्याच्या राजकारणात ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी भाजपची बाजू मांडली. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि अभिषेक पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांनी सन्मानजनक जागावाटपावर सहमती दर्शवली आहे. या बैठकीत केवळ युतीच नव्हे, तर विरोधकांना (महाविकास आघाडी) शह देण्यासाठी ‘चेकमेट’ करण्याची रणनीतीही आखण्यात आल्याचे समजते.











