जळगाव जिल्हागुन्हे

भोकर SBI दरोड्याचा मास्टरमाइंड बडतर्फ PSI! कारागृहातच रचला २७ किलो सोन्याच्या लुटीचा कट

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेवर पडलेल्या दरोड्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दरोड्याचा मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, कारागृहात असतानाच त्याने साथीदारांसोबत दरोड्याचा कट रचल्याचे तपासात समोर येत आहे. दरम्यान, तालुका आणि धरणगाव पोलिसांनी अवघ्या काही वेळात कारवाई करत चारही संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून लुटीतील सोन्याच्या बॅगा आणि सुमारे १५ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर जासक याने २०२३ मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँकेत शालकाच्या मदतीने ३ कोटी १७ लाख रुपयांचा दरोडा टाकला होता. या गुन्ह्यात तो कारागृहात होता. दोन ते तीन महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. दुसरीकडे, गजानन राजेंद्र पवार हा २०२४ मध्ये चाळीसगाव शहरालगत अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीच्या खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. तोही दीड महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आला होता.

जळगाव मध्यवर्ती कारागृहात असतानाच शंकर जासक आणि गजानन पवार यांची ओळख झाली. याच ओळखीतून दोघांनी अन्य साथीदारांच्या मदतीने भोकर येथील SBI बँक लुटण्याचा कट आखल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.

ठरल्याप्रमाणे चार आरोपींनी बँकेत प्रवेश केला. छऱ्याच्या पिस्तुलाचा धाक दाखवून बँक व्यवस्थापक आणि कॅशियर यांना धमकावले. दोघांच्या डोक्याला पिस्तूल लावत आरोपींनी बँकेतील तब्बल १६ लॉकर उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर लॉकरमधील सोने आणि रोकड पाच ते सहा बॅगांमध्ये भरून आरोपींनी पळ काढला. आरोपी जवळपास ४० ते ४५ मिनिटे बँकेत असल्याची माहिती आहे.

पोलीस पाटलांच्या सतर्कतेमुळे आरोपींच्या मुसक्या आवळल्या

दरोड्याची माहिती मिळताच भोकर येथील पोलीस पाटलांनी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. आरोपींचे वर्णन आणि ते कोणत्या दिशेने पळाले, याची माहिती त्यांनी दिली. त्यावेळी बीट अंमलदार रिधूर आणि डिक्साई परिसरात तपासकामी होते. माहिती मिळताच त्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिसरात नाकाबंदी करण्यात आली. त्यानंतर डिक्साई येथे दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, उर्वरित दोघे वाहनाने धरणगावच्या दिशेने गेल्याचे समोर आले. यानंतर शशिकांत पाटील यांनी धरणगाव पोलिसांशी संपर्क साधून आरोपींचे वर्णन आणि पळून जाण्याच्या दिशेची माहिती दिली. धरणगाव पोलिसांनीही तत्परता दाखवत उर्वरित दोघांना ताब्यात घेतले.

चावलखेड्याजवळ बॅगा फेकल्या, शेतात लपून बसलेल्या आरोपींना पकडले

दरोड्यानंतर आरोपींचा भोकर येथील ग्रामस्थांनी पाठलाग सुरू केला होता. यावेळी आरोपींनी चावलखेड्याजवळ रस्त्याच्या बाजूला चार बॅगा फेकून दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबवली. याचदरम्यान शंकर जासक आणि गजानन पवार हे दोघे एका शेतात लपून बसलेले आढळल्याची माहिती आहे.

या कारवाईत तालुका पोलिसांनी दोन, तर धरणगाव पोलिसांनी दोन अशा एकूण चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे १५ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याच्या बॅगा हस्तगत करण्यात आल्या आहेत.

पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भोकर येथील बँकेत भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पोलीस पथक उपस्थित होते.

२७ किलो सोन्याची लूट? मुद्देमालाची मोजदाद सुरू

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भोकर येथील SBI बँकेतून जवळपास २७ किलो सोने लुटण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्याकडून बॅगा हस्तगत करण्यात आल्या आहेत. मात्र, सोन्याचे नेमके वजन आणि रोकड यांची मोजदाद व पडताळणी सुरू आहे.

या प्रकरणात अद्याप एफआयआर दाखल झालेला नसल्याने पोलिसांकडून प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. आरोपींची नावे, मुद्देमालाचा अंतिम तपशील आणि तपासातील अन्य बाबी अधिकृत प्रेस नोटद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कारागृहातील ओळखीतून आखलेला दरोड्याचा कट, बँकेतील १६ लॉकर फोडून केलेली लूट आणि त्यानंतर पोलिसांनी केलेली वेगवान कारवाई यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस पाटलांची सतर्कता, बीट अंमलदारांची तत्परता, ग्रामस्थांचे सहकार्य आणि तालुका व धरणगाव पोलिसांमधील समन्वय यामुळे चारही संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button