मुक्ताईनगरला ‘अमृत’ देतय तरी कोण? नाथाभाऊ कि चंदूभैय्या?

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२२ । मुक्ताईनगरच्या उज्वल भविश्यासाठी अतिशय महत्वाची ठरणारी अमृत २.० पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल ३२ कोटी रूपयांच्या कामला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र आता हे श्रेय कोणाचे? एकनाथराव खडसेंचे कि आ.चंद्र्कांत पाटलांचे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कारण हे काम आपल्यामुळेच झाल्याचे श्रेय दोन्ही आमदारांनी घेतले आहे.

२०२१-२२ वर्षापासून देशात केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० ही योजना राबविण्यात येत आहे. याच्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाणी पुरवठा, जलसाठ्यांचे पुनरूज् जीवन आणि हरीतक्षेत्र विकास आदी कामे करण्यात येत आहेत. यात राज्यातील ४४ शहरांमध्ये अमृत २.० योजना राबविण्यात येणार असून यामध्ये मुक्ताईनगरची निवड करण्यात आली होती. याच योजनेला आता प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या संदर्भातील शासनाचा जीआर देखील जारी करण्यात आला आहे.

अमृत २.० योजनेसाठी ३२ कोटी ३४ लक्ष रूपयांच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे. यातील केंद्र सरकार १६.०७ कोटी रूपये तर राज्य सरकार १४.४६ कोटी रूपये देणार आहेत. तसेच मुक्ताईनगर नगरपंचायतीला १.६१ कोटी रूपयांची तरतूद करावी लागणार आहे. या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दीड वर्ष म्हणजे १८ महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण करण्यात यावी असे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत.

तर दुसरीकडे या योजनेचा जीआर निघाल्यानंतर आमदार एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील या दोन्ही गटांतर्फे आपणच यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा करण्यात येत आहे. खडसे यांच्या समर्थकांनी नाथाभाऊंमुळेच या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांनी चंदूभैयामुळेच मुक्ताईनगरसह बोदवड आणि सावदा येथील पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्याचे सांगण्यात आले आहे. अर्थात, दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयासाठी चढाओढ सुरू झाली असली तरी ही योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मुक्ताईनगरच्या नागरिकांची अपेक्षा आहे.