⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Eknath Shinde Updates : शिवसेनेचे आमदार किशोरआप्पा पाटील आहेत कुठे, मुंबई का गुजरात?

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजीचे फटाके फुटू लागले आहेत. दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे आपल्या ११ समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या गटातील आमदारांना घेऊन गुजरातमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती आहे. यामुळे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील नेकमे कुठे आहेत, मुंबईला का गुजरातमध्ये? ही चर्चा जळगाव जिल्ह्यात रंगली आहेत.

किशोरआप्पा पाटील हे शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शिंदे यांच्या मदतीने किशोर पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून पाचोरा व भडगाव तालुक्यांमध्ये विकासकामे केली आहेत. मध्यंतरी शिंदे पाचोरा येथे एका गुप्त दौर्‍यावर आल्याचे समोर आले होते. यानंतर जिल्हा शिवसेनेच्या गोटात उलटसुलट चर्चा रंगली होती. मुळात जळगाव जिल्हा शिवसेनेत उघडपणे दोन पडले आहेत, हे कुणीही नाकारु शकत नाही.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मातोश्री गटाचे मानले जातात. असे असले तरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार चिमणराव पाटील यांच्याशी त्यांचे पटत नाही. तर आमदार किशोर पाटील हे शिंदे समर्थक आहेत. यामुळे गुलाबराव पाटील व किशोर पाटील यांच्यातही कुरघोडीचे डाव अधूनमधून रंगत असतात. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यपध्दतीवर नाराज असल्याने ते आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातला निघून गेले आहेत. यामुळे त्यांच्या सोबत कोण कोण आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. आमदार किशोर पाटील हे देखील नॉट रिचेबल असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी केलेल्या दाव्यानुसार, किशोर पाटील हे मुंबईमध्ये उध्दव ठाकरेंसोबत आहेत.

हेही वाचा : Eknath Shinde Updates : गुजराथी भाषेत व्हायरल होतेय फुटलेल्या १९ आमदारांची यादी

कोण कोण आमदार गुजरातमध्ये?
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे इतर दोन मंत्रीही गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. तसंच बालाजी किणीकर, संजय शिरसाट, शांताराम मोरे, महेंद्र दळवी आणि नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील काही आमदार हे शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये निघून गेले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. तर काही वेळापूर्वीच बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि संजय गायकवाड हेदेखील नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. संजय रायमूलकर यांनी काहीवेळापूर्वीच व्हाट्सअ‍ॅपच्या डीपीवर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे हे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील, असे सांगितले जात आहे. तसेच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आणि अकोल्याच्या बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हेदेखील नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.