जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२३ । बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत असून पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होणार? याची वाट शेतकरी पाहत असताना हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २ ते ४ डिसेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळू शकतो. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मागील गेल्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाचं थैमान सुरुच असल्याने बळीराजा मात्र संकटात सापडला आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आयएमडी (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात आज अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज जळगावात सायंकाळी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मुंबई, पुणे कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाडामधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील काही दिवस वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभावही कायम राहणार आहे. यामुळे पर्वतीय प्रदेशात बर्फवृष्टी होईल आणि लगतच्या मैदानी प्रदेशात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, चंदीगड, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही अवकाळी पावसासह गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडूतील चेंगलपट्टू, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात जोरदार पाऊस होणयाची शक्यता आहे. ३ आणि ४ डिसेंबरला आंध्र प्रदेशात दक्षिण किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.