जळगाव जिल्ह्यात ‘वैशाख वणवा’: वेगाने बाष्पीभवन, आता धरणांमध्ये ‘इतके’ टक्के जलसाठा?

मे 12, 2026 1:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात सध्या वैशाख वणव्याच्या तीव्र झळा बसत असून तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. दुसरीकडे या तीव्र उष्णतेमुळे धरणांमधील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असून यामुळे धरणांमधील जलसाठा कमालीचा खाली आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये मिळून सरासरी 41.66 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

girna dam

जिल्ह्यात गिरणा, हतनूर आणि वाघूर हे ३ मोठे, १४ मध्यम आणि ९६ लघू असे एकूण ११३ प्रकल्प आहेत. या मोठ्या ३ प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी ४५.२२ टक्के उपयुक्त साठा आहे. उन्हाळ्याची तीव्रता पाहता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गिरणा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी चौथे राखीव आवर्तन सोडण्यात आले होते. ४-५ दिवसांनंतर हे आवर्तन बंद करण्यात आले आहे. आवर्तन सोडल्यानंतर सध्या धरणात १६८.९५ दशलक्ष घनमीटर (५.९७ TMC) म्हणजेच ३२.२७% साठा आहे. दिलासादायक म्हणजे गतवर्षीपेक्षा गिरणेचा जलसाठा ३ टक्क्यापेक्षा जास्त आहे. आजच्या दिवशी गिरणेचा जलसाठा हा २८.२३% इतका होता.

मध्यम प्रकल्पातील जलसाठा?

मन्याड 24.73, भोकरबारी 26.54, सुकी 74.92, अभोरा 62.50, अग्नावती 12.06, तोंडापूर 26.94, हिवरा 26.60, मंगरूळ 46.51, बहुळा 37.56, मोर 64.59, अंजनी 53.08, गुळ 58.09, शेळगाव बॅरेज 62.24 आणि 96 लघू प्रकल्पात 26.70 असा 640.63 दशलक्ष घनमीटर अर्थात 22.62 टिएमसी नुसार सरासरी 41.66 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

४ गावांसाठी 7 टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यात वाढते तापमान, नदी नाल्यामधील आटलेले जलप्रवाह, खोलवर गेलेले पाणी पातळी पहाता पाणीटंचाई मोठया प्रमाणात जाणवून येत आहे. सद्यस्थितीत चार गावांसाठी 2 शासकिय आणि 5 खासगी असे सात टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. भुसावळ तालुक्यात एक, अमळनेर तालुक्यात 3 गावांसाठी 2 शासकिय व 4 खासगी असे 7 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी याच कालावधीत 14 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. असे प्रशासनाने म्हटले आहे.

जलसाठा वेगाने आटत असल्यामुळेच जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी ३७ गावांमध्ये खाजगी विहिरींचे अधिग्रहण केले असून, ४ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. म्हणूनच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now