⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

व्हॉलीबॉलपटू मामासाहेब गुरव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२१ । ‘स्व.मामासाहेब ऊर्फ कोंडदेव शंकरराव गुरव’ यांनीखान्देशातील 1945 ते 1995 या पाच दशकात शॉटी व्हॉलीबॉल या खेळातत्यांच्या योगदानाने अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवित या खेळाचा प्रचार-प्रसार केला. याबाबद्दलची संपूर्ण माहिती आज दि १२ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जयंत गुरव यांनी दिली.

2021-22 हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राज्य शासनाच्या ‘यशदा’ या ग्रामीण विकास संस्थेचे सेवानिवृत्त सहाय्यक संचालक व त्यांचे पूत्र जयंत गुरव यांनी दिली.
जिल्ह्यातील भालोद या गावी जन्म झालेल्या मामासाहेब गुरव यांनी माध्यमिक शिक्षणापासून व्हॉलीबॉल खेळायला सुरुवात केली. 1950 च्या सुमारास खान्देशात त्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत नाव लौकिक मिळविला. जेडीसीसी बँकेमधील नोकरीनिमित्ताने होणार्‍या बदलीच्या ठिकाणी प्रत्येक गावात त्यांनी व्हॉलीबॉल ग्राऊंड निर्माण करणे, खेळाडू घडविणे हे व्रत कायम जोपासले असे गुरव यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

जयंत गुरव यांनी मामासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त फेब्रुवारी महिन्यात व्हॉली बॉलच्या स्पर्धा व जेष्ठ खेळाडूंचा सत्कार करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचं सांगितलं तसेच यानिमित्त मामासाहेब व त्यांचे समकालीन खेळाडू, पूर्वी झालेल्या स्पर्धा याविषयी माहिती, आठवणी व फोटो संकलीत करुन स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

स्पर्धा व स्मरणिकेसाठी लवकरच स्वतंत्र समित्या देखील घोषित करण्यात येणार असून ज्यांच्या जवळ मामासाहेब गुरव व त्यांच्या समकालीन खेळाडूंची माहिती, फोटो, आठवणी, लेख असतील त्यांनी जयंत गुरव (व्हॉटस्अप क्र.9823042399) ई-मेल gurav.jayant53@gmail.com यावर अथवा गौरव सफळे (कर सल्लागार) 7, पहिला मजला, मल्हारा मार्केट, जुन्या बस स्टॅण्ड समोर जळगाव येथे पाठवावे असे शेवटी त्यांनी आवाहन केले.