जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात बेकायदेशीर गावठी दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी आता थेट ‘ॲक्शन मोड’ धारण केला आहे. जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) कार्यालयाचे विशेष पथक आणि शहर पोलिसांनी सोमवारी (दि. २५) सायंकाळी शिवाजीनगर हुडको भागात सज्जनगड बिल्डिंगच्या आडोशाला सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड टाकली. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ३० लिटर गावठी दारू जागीच नष्ट केली असून एका २५ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

विवेक विजय ढाके (वय २५, रा. घर नंबर २४, सिंधुदुर्गगड, शिवाजीनगर हुडको, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून या कारवाईने परिसरात खळबळ उडाली.

जळगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) नितीन गणापुरे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की, शिवाजीनगर हुडको परिसरातील सज्जनगड बिल्डिंगच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत एक तरुण बेकायदेशीरपणे गावठी दारूची विक्री करत आहे. माहितीची गांभीर्याने दखल घेत डीवायएसपींनी शहर पोलीस ठाणे आणि आपल्या खास पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
पोलिसांचा अचानक धाडसी छापा
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार दीपक शिरसाठ, स. फौ. सुनील पाटील, पो. हे. कॉ. वीरेंद्र शिंदे, पो. कॉ. अमोल ठाकूर, प्रणय पवार तसेच डीवायएसपी कार्यालयाचे पो. कॉ. सचिन साळुंखे आणि आवेश शेख यांच्या संयुक्त पथकाने पंचांना सोबत घेऊन सदर परिसरात सापळा रचला.
सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी नियोजित ठिकाणी अचानक धाड टाकली. यावेळी आरोपी विवेक ढाके हा एका ३५ लिटर मापाच्या मोठ्या प्लास्टिकच्या कॅनसह ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेला आढळून आला. पोलिसांनी कॅनची तपासणी केली असता, त्यात उग्र आणि आंबट वासाची अंदाजे ३,१०० रुपये किमतीची ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली.
रासायनिक परीक्षणासाठी नमुना घेऊन मुद्देमाल नष्ट
पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून पंचांसमक्ष या दारूच्या कॅनमधून रासायनिक विश्लेषणासाठी (C.A. Sample) १८० मिली दारू एका काचेच्या बाटलीत काढून सीलबंद केली. त्यानंतर आरोग्याला घातक ठरू शकणारी उर्वरित सर्व बेकायदा गावठी दारू पंचांच्या देखरेखीखाली जागीच ओतून नष्ट करण्यात आली.
या धडक कारवाईप्रकरणी डीवायएसपी कार्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुरेश साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (तक्रारीवरून) आरोपी विवेक ढाके याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत पोलिसांनी राबवलेल्या या विशेष मोहिमेमुळे शहरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.







