⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

कोरोना परतला : राज्यातील शाळा सुरू होणार कि नाही? वाचा काय म्हणाल्या शिक्षणमंत्री

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२२ । राज्यात मागील दोन महिने आटोक्यात असलेली कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. यामुळे वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरु होणार कि नाहीय अशी शंका पुन्हा पालकांना वाटू लागली आहे. अशातच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली.

राज्यात वाढत्या कोरोना रुग्ण पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली पण काळजी घेऊन शाळा (Maharashtra School) सुरु ठेवू, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पुन्हा एका चिंतेचा विषय बनली आहे. 15 जूनपासून शाळा सुरु होणार आहे. शाळांसाठी एसओपी जारी करण्यात येईल. शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसात घेण्यात येईल. तसेच शिक्षण विभाग शाळांकरता नवी कोविड नियमावली जारी करणार आहे.

कोरोनामुळे शाळा दीर्घ काळ बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं आहे. विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याकरता अवघे काही दिवस राहिले आहेत. कोरोना रुग्णसंख्या देशभरात वाढत आहे. राज्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकार शाळांबाबत कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.