जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । कोरोनाचा तांडव दिवसेंदिवस वाढत असून देखील प्रशासकीय प्रणालीमधील गोंधळ कमी होत नाहीये. यात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. यात भर म्हणजे भुसावळातील एका दाम्पत्यास कोरोनाची लस न घेताच वॅक्सीनेशन पूर्णचा एसएमएस आला.
यामुळे पुन्हा एकदा प्रशासकीय गलथानपणा समोर आला आहे. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. तौसिफ खान यांनी दाम्पत्याचे लसीकरण करुन घेतले. या नवनवीन घटनांमुळे नागिरकांमधून रोष व्यक्त असून यामुळे संभ्रमाचे वातावरण वाढत आहे.
वन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी एस.पी.पाटील व त्यांच्या पत्नी सुषमा पाटील यांनी १३ मार्चला कोविन अॅपवर नोंदणी करुन लसीकरणासाठी ५ एप्रिल रोजीची वेळ नोंदवली होती. सोमवारी रुग्णालयात गेले. परंतु, तेथील लसीकरण बंद झाल्याने त्यांना महात्मा फुले आरोग्य केंद्र, वेडीमाता मंदिर भागात पाठवण्यात आले.
महात्मा फुले आरोग्य केंद्रावर आले असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांचेकडे कोरोना निगेटिव्हचा रिपोर्ट मागितला. त्यामुळे ते अॅन्टिजन चाचणी करण्यासाठी निघून गेले. यानंतर काही वेळातच त्यांना कोविन अॅपवरुन लसीकरण पूर्ण झाल्याचा असा मेसेज आला. त्यामुळे पाटील दाम्पत्याने पुन्हा महात्मा फुले केंद्र गाठले. तेथे डॉ. तौसिफ खान यांनी त्यांना लस दिली.