⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

महाराष्ट्रात ‘हे’ एकमेव गाव जिथे महिला व पुरुषांना दिला जातो मान…

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । काळाराम मंदिरात दलीतांना प्रवेशासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केल्याचा इतिहास आहे, या पार्श्वभूमीवर प्रत्येक घटकाला सन्मान मिळावा अशा भुमिकेतून बांभोरी खुर्द येथे हनुमान जन्मोत्सवाचा सर्व पुजाविधी दलीत व आदिवासी समाजातील तरुणांच्या हस्ते करण्यात येऊन तळागाळातील समाजाला मान देण्यात आल्याचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

एरंडोल तालुक्यातील सर्वात लहानसे गाव बांभोरी खुर्द हे वनकोठा ग्रामपंचायत अंतर्गत येते गावाची लोकसंख्या ३०० च्या जवळपास आहे, क्षत्रियांची फक्त ५घरे असून मोठ्या संख्येने आदिवासी भील्ल समाज आहे. तर त्यांच्या खालोखाल दलीत समाज आहे. या गावात ग्रामपंचायत कार्यालय नसून शासकीय जि.प.ची मराठी शाळा आहे, येथे राष्ट्रीय सणाला सरपंच अथवा कोणत्याही पदाधिकारीच्या हस्ते ध्वजारोहण न होता याच गावातील तळागाळातील मानसन्मान पासून उपेक्षित, महिला पुरुषांना हा मान दिला जातो, ही परंपरा वर्षानुवर्षांपासून सुरु आहे, झेंडावंदन ज्यांच्या हातून झाले नाही, कदाचित असा व्यक्ती या गावात नसेल. गावात कोणती ही तंटामुक्ती समिती नाही, परंतू या गावातून पोलिस ठाण्यात आजतागायत एक ही तक्रार दाखल झालेली नाही, किरकोळ वाद गावातच मिटविले जातात. गावात रोटेशन प्रमाणे जर एक प्रभाग झाला, तर त्या प्रभागात निवडणूक न होता गावकरी एकत्र बसून सर्वसंमतीने उमेदवार बिनविरोध निवड करतात. ह्या अतिशय लहान गांवात शेतमजूर, कष्टकरी लोकांचीच वस्ती असून देखील या गावात हनुमानाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.

यंदा हनुमान जयंतीच्या पुजाविधीचा मान गावातील नवतरुण दलीतवस्तीतील गोपाल खैरनार, आदिवासी वस्तीतील सुनील मोरे व राजपूत समाजाचे निलेश पाटील यांना देण्यात आला होता. पुरोहित तूषार वडगावकर यांनी धार्मिक विधी पार पाडला आहे.आगळ्यावेगळ्या या धार्मिक कार्यक्रमासाठी नारायण पाटील, गोपीचंद पाटील,भवरसिंग पाटील,राहूल पाटील, ऋषीकेश पाटील,बंडू पाटील,भिका पाटील,जगदीश पाटील महेंद्र निकम, मिलिंद खैरनार, सचिन खैरनार, चेतन पाटील, योगेश मोरे, अनिल मोरे, बारकू भील, जयदीप पवार, गोपाल पाटील, अमरदिप पाटील, आबा भोई, विकास मोरे, आकाश मोरे, प्रविण मोरे आदी परिश्रम घेतले.

याप्रसंगी सपोनि. निता कायटे यांनी भेट दिली, गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हे एकमेव गांव असावे की, पोलिस ठाण्यात येथील आजतागायत एक ही तक्रार दाखल नाही, असे गौरवोद्गार काढले, त्यांचे सह रविंद्र चौधरी, नाना पाटील, निलेश अग्रवाल, विशाल पाटील हे कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हभप संजय जमादार यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार प्रमोद पाटील यांनी मानले.