जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२४ । जालना ते जळगाव दरम्यान नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. १७४ किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग असणार असून या मार्गासाठी अंदाजित ७ हजार १०६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. निधीच्या ५० टक्के वाटा केंद्र सरकार आणि ५० टक्के राज्य सरकार देणार आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने आठ नव्या रेल्वे मार्गांना मंजुरी दिली. महाराष्ट्रातील जालना ते जळगाव या नव्या रेल्वे मार्गाच्या निर्मितीमुळे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांना जाणे सोयीचे होणार असल्याचं ते म्हणाले आहे. या रेल्वेमार्गामुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातशी संपर्क सोयीचा होणार आहे. या रेल्वेमार्गासाठी ९३६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून आता कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच भूसंपादनासह पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
असा आहे हा लोहमार्ग
जालन्यातून पीरपिंपळगाव, बावणे पांगरी, श्रीक्षेत्र राजूर, भोकरदन, सिल्लोडमार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव असा ७० टक्के मार्ग जालना लोकसभा क्षेत्रातून जाणार आहे आणि याचा फायदा पुढे सुरत, गुजरात, राजस्थानच्या गाड्यांना आंध्र प्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी जवळचा छोटा मार्ग म्हणून होणार आहे.