⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

Unfortunate : विहीरीत पडून निलगायचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । नर जातीच्या नीलगायचा पाय विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी नियतक्षेत्रात घडली. हा प्रकार दि. ४रोजी उघडकीस आला. या प्रकरणी पंचनामा करण्यात आला असून सदर घटना ही पाच दिवसापुर्वी घडली असावी असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला. दरम्यान, या जंगलात हा एकमेव जिवंत पाण्याचा स्रोत आहे. पीरबाबा दर्ग्यावर येणाऱ्या भाविकांना व या भागातील वन्यजीवांचा पाणीप्रश्न सोडवणारी ही पायविहीर आहे. त्यामुळे या विहिरीचे कठडे उंच करण्यात यावे अथवा जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सुकळी येथील जंगलात पुरातन कालीन एक पायविहीर आहे. बारमही जिवंत पाणीस्रोत असणाऱ्या विहीरीलगत वनहद्द असुन वन्यप्राण्यांची संख्या विपुल प्रमाणात आहे. या पायविहिरीत कुजलेल्या अवस्थेत निलगायी आढळुन आली. सुमारे चार-पाच दिवसांपूर्वी पडली असावी असा कयास आहे. कोणते तरी मासंभक्षी प्राणी पाठलाग करीत असताना सैरवैर धावत असताना अपघाताने सदर निलगाय दुर्दैवाने विहीरीत पडली असावी असा अंदाज वनविभाच्या अधिकाऱ्यांकडुन घटनास्थळी पाहणी करुन वर्तविण्यात आले. घटनेबाबत माहीती मिळताच प्रभारी वनक्षेत्रपाल आशुतोष बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली डोलारखेडा वनपाल पी. टी. पाटील, उ.डो.वनरक्षक जी. बी. गोसावी,वनमजुर संजय सांगळकर,योगेश कोळी,अशोक पाटील, सिद्धार्थ थाटे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.निलगायीचा कुजलेला मृतदेह विहिरीतुन बाहेर काढून अंत्यविधी केला. याकामी शेतकरी कमलेश पाटील, संजय कवरे यांचे सहकार्य लाभले. सदर विहीरीतील पाणी कुजलेल्या मृतदेहामुळे दुषित झाले असुन डिझल इंजिनद्वारे पाणी उपसा करण्यात यावा अशी मागणी स्थानिक लोकांची आहे.जंगलात सदर ठिकाणी हा एकमेव जिवंत पाण्याचा स्रोत असून पीरबाबा दर्ग्यावर येणाऱ्या भाविकांना व या भागातील वन्यजीवांचा पाणीप्रश्न सोडवणारी ही पायविहीर आहे. तसेच या विहिरीचे कठडे उंच करण्यात यावे अथवा जाळी बसविण्यात यावी अशी मागणी वजा अपेक्षा आहे. पट्टेदार वाघा़ंचा मुक्त संचार असलेल्या या भागात तृणभक्षक प्राण्यांची संख्या विपुल प्रमाणात आहे. गत सुमारे चार-पाच दिवसांपूर्वी निलगायीचा मृतदेह पाण्यात होता मात्र हा प्रकार वनकर्मचाऱ्यांना लवकर कसा लक्षात आला नाही? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. सुकळी नियतक्षेत्रातील वनरक्षक अनेकदा गैरहजर रहात असुन नियमित जंगलात फिरत नसुन वनसंपदेला धोका निर्माण झाला आहे. तसेच वन्यप्राण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. वाघांचा मुक्त संचार असलेल्या या भागात एक अनुभवी कर्तव्यदक्ष वनरक्षकाची नेमणुक करावी अशी ओरड स्थानिक लोकांची आहे. या खेरीज वन्यप्राण्यांच्या अधिवासास पुरक वातावरणाची निर्मिती जंगलपरीसरात होणे गरजेचे आहे‌. वाघांसह अन्य प्राणी सहजरीत्या शेती-शिवारात घुसुन वास्तव्य करीत आहे. यासाठी सुकळी-दुई परीसरातील केळी बागा. केळीबागेत असलेला ओलावा व गारवा वन्यजीवांना आकर्षित करीत आहे. वनविभागाने याबाबत अभ्यास करुन जंगलातच नाल्याठिकाणी वडाचे झाडे लावुन जातीने लक्ष घालुन जगविले पाहीजे. एकप्रकारे नैसर्गिक गारवा जंगलातच तयार होऊन वन्यप्राणी शेतीशिवाराकडे कुच करणार नाही. नादुरूस्त असलेले गळके पाणवठे दुरुस्त करुन नियमित त्यात पाणी सोडले गेले पाहीजेत. ठिकठिकाणी माती बांध, नाला बांध बांधून पावसाळ्यात वाहुन जाणारे पाणी मोठ्या प्रमाणावर अडविले पाहीजे. तसेच शेती-शिवाराच्या बाजुने वनहद्दीत कुंपण अथवा खंदक खोदुन घेतला पाहीजे जेणेकरुन मानव वन्यजीव संघर्षाला आळा बसेल अशा मागण्या परीसरातुन होत आहे.