⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

‘हर घर तिरंगा’ मोहिमे अंतर्गत महापौर जयश्री महाजन यांनी घरावर उभारला ‘तिरंगा’

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. याअनुषंगाने जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्यातील स्मृती तेवत रहाव्यात व देशभक्तीची ज्वाजल्य भावना कायमस्वरुपी मनात राहावी, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतिकारक/स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेली स्फूर्ती व देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी या उद्देशातून दि.13 ऑगस्ट 2022 ते दि.15 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्रशासानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण शहरात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

सदर कालावधीत शहरातील प्रत्येक शासकीय/निमशासकीय व खासगी आस्थापनांवर त्यांनी त्यांच्या इमारतींवर व नागरिकांनी स्वत:च्या घरावर राष्ट्रध्वजाची स्वयंस्फूर्तीने उभारणी करावयाची आहे. राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या, विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत/पॉलिस्टर/लोकर/सिल्क/खादीपासून बनविलेल्या कापडाचे असावेत. सर्व नागरिकांना राष्ट्रध्वज माफक दरात शहरात विविध ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले असून नागरिकांनी राष्ट्रध्वजाची स्वयंस्फूर्तीने सन्मानपूर्वक उभारणी करताना जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी म्हणजेच भारतीय ध्वजसंहितेचे पालन करावे, असे आवाहन विविध पातळीवर शासनाद्वारे केले जात आहे.

याअनुषंगाने जळगाव शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी आज शनिवार, दि.13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी आपल्या निवासस्थानी म्हणजेच घरावर राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ची उभारणी करुन मानवंदना दिली. प्रत्येक देशवासियाने ‘तिरंगा’चा सन्मान राखून आपल्या घरावर तिरंगा उभारलाच पाहिजे असेही यावेळी महापौर सौ.महाजन म्हणाल्यात.