⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

उद्धव वि राज : रमेश किणी यांचा मृत्यू अन उडाली राज्यात खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना 1995 मध्ये तिच्या वयात आली होती. ती तरुण झाली होती यामुळे शिवसेनेला तरुण नेतृत्व हवे होते. बाळासाहेबांचा उत्तराधिकारी हा राज ठाकरेच असणार असे मत तेव्हा तमाम शिवसैनिकांचे किंवा राजकीय विचारवंतांचे होते. राज ठाकरेंना त्याकाळी शिवसेनेमध्ये बाळासाहेबांप्रमाणेच आदर होता. मात्र 23 जुलै 1996 या दिवशी शिवसेनेच्या इतिहासाला आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला कलाटणी देणारा प्रसंग शिवसेनेच्या इतिहासात घडला. तो म्हणजे याच दिवशी रमेश किनी नावाचे गृहस्थ जे माटुंगा मधील लक्ष्मीनिवास इमारतीमध्ये राहत होते त्यांचा मृतदेह पुण्यामधील अलका टॉकीजमध्ये सापडला.

1995 साली शिवसेनेची महाराष्ट्रावर सत्ता आली होती मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले छगन भुजबळ हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते. रमेश किणी यांच्या विधवा पत्नी शीला या छगन भुजबळ यांच्याकडे आल्या आणि त्यांनी कैफियत मांडली. रमेश किणी मी सेनाभवनात जातोय असं सांगून गेले आणि घरी आलेच नाहीत. शीला यांनी आरोप केला की 23 जुलै 1996 रोजी अलका टॉकीजमध्ये रमेश किणी यांचा मृतदेह सापडला, यामागे राज ठाकरे यांचा हात आहे. रमेश किणी यांनी आत्महत्या केल्यावर आपल्या खिशात चिठ्ठी ठेवली होती त्याबाबत त्यांच्या पत्नी संशय व्यक्त केला. मात्र मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने झाला होता असे पोस्टमोर्टमचे रिपोर्ट सांगत होते.

रमेश किणी आपली पडकी चाळ देत नव्हते म्हणून त्यांचा खून करण्यात आला असा देखील आरोप त्यांनी केला. याचे पडसाद विधान परिषदेत आणि विधानसभेत उमटले माधवराव पिचड व छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी विधिमंडळात केली. आपण या प्रकरणी निर्दोष आहोत असे राज यांनी जाहीर केले मात्र किणी ज्या इमारतीत राहत होते तिथे मालक लक्ष्मीनंदन शहा आणि त्यांचे चिरंजीव सुमन यांच्याशी आपले घनिष्ट संबंध असल्याचे त्यांनी मान्य केले. रमेश किणी व मी कधीही भेटलो नाही असेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्यावर आरोप सुरू होते. सामना वृत्तपत्रामध्ये तर किणी कोण गांधी लागून गेला की काय अशा प्रकारचा लेखच बाळासाहेबांनी प्रकाशित केला. तपास वेळी पोलिसांनी आशुतोष राणे याला अटक केली. अशितोष राणे हा राज ठाकरे यांचा खास कार्यकर्ता होता. यानंतर राजकारण अधिकच पेटले.

रमेश किणी यांचा मेंदू गायब करण्यात आला अशाही बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या. शिवसेनेच्या राज्यात मराठी माणसाला सक्तीने आत्महत्या करावी लागणार का? असे प्रश्न विचारण्यात आले. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. अखेर सीबीआयने राज यांची आरोपातून मुक्तता केली. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी विधिमंडळात हे जाहीर केले. त्यांचा मृत्यू हा हृदयविकार या कारणामुळे झाला होता. राज हे निष्पाप आहेत यावर आपला विश्वास खरा ठरला असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले तर जो हातात भगवा धरतो तो कधीही पाप करू शकत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले

सीबीआयने राज यांना दोषमुक्त केले तरी शाह पिता-पुत्रांना आणि आशुतोष राणे यांना मात्र आरोपी ठरवले. कालांतराने आशुतोष राणे यांना न्यायालयाने निर्दोष ठरवले तर लक्ष्मीकांत आणि सुमन शहा यांना ऑगस्ट 2002 मध्ये निर्दोष मुक्त करण्यात आले. पिता-पुत्रावर गुन्हेगारी पद्धतीने कट रचणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे या अंतर्गत आरोप ठेवण्यात आले. राज ठाकरे यांची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली होती मात्र सरकार पक्षाने सुप्रीम कोर्टात जाण्याचे टाळले.

या सर्व प्रकारात राज ठाकरे हे मुक्त जरी झाले तरी पण शिवसेनेमध्ये त्यांच्या असलेल्या छबीला डाग लागलाच आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व द्यायचा विचार होऊ लागला. अशाप्रकारे शिवसेनेचे भविष्य बदलणारा हा ऐतिहासिक प्रसंग ठरला.