जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२४ । गेल्या आठवड्यात जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. राज्यात अवकाळी पावासाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर या केळीबहुल भागाला बसला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक नुकसानीत गेल्याने ते संकटात आले आहे.

दरम्यान अवकाळी पावसामुळे जळगाव, धुळे, सांगली या तिन्ही जिल्ह्यांत सुमारे २,६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला २७ आणि २८ डिसेंबर रोजी पावसाचा अलर्ट जारी केला होता. त्यानुसार २७ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोबतच काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि गारपीठही झाली. यामुळे जिल्ह्यातील पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: रावेर आणि यावल या केळीबहुल भागाला सर्वाधिक फटका बसला आहे.

या अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर आणि कापसाचे नुकसान झाले आहे. ज्वारी, दादर आणि केळी पिकांना देखील मोठा फटका बसला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता शासनाने तातडीने मदत करून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याची गरज आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.







