⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

नशिबाने केला घात : मृत्यूने केला पाठलाग, अपघातात दोघे विद्यार्थी ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । बारावीचा गुरुवारी शेवटचा पेपर होता. पण हाच पेपर दोन विद्यार्थीचे आयुष्यही शेवट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चुकून दुसऱ्या रेल्वेत बसल्याने “अखेरचा’ पेपर देण्यासाठी निघालेल्या मुलीला पाचोर्‍याऐवजी चाळीसगावला उतरावे लागले आणि तिला चाळीसगाहुन सोडण्यासाठी आलेल्या तरुणाच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मुलीचा खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. ही घटना भडाळी भामरे (ता. पाचोरा) रस्त्यावर गुरुवारी सकाळी १० वाजता घडली. शेवटचा पेपर देण्यासाठी सुरु झालेली तिची धडपड थेट तिला मृत्यूपर्यंत घेऊन गेली. पायल कैलास पवार (१९ रा. शिवाजीनगर, जळगाव) आणि तेजस सुरेश महेर (२०, रा. पांगरा ता. कन्नड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, पायल ही बारावीचा शेवटचा पेपर देण्यासाठी गाळण (ता.पाचोरा) कडे निघाली होती. परंतु ती चुकीने पाचोरा येथे न थांबणाऱ्या रेल्वेत बसली. चाळीसगावात उतरली. चाळीसगाव येथे उतरल्यावर तिने शिक्षकांना फोन केला. त्यांनी पांगरा येथील युवक तुला गाळणला सोडून देईल, असे सांगितले. त्याप्रमाणे तेजस व पायल हे मोटारसायकलने गाळणकडे येत असताना भडाळी भामरे या गावाजवळ समोरून येणारी व्हॅन आणि मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक झाली. यात तेजस हा जागीच ठार झाला. जखमी पायल हिला चाळीसगाव येथे नेण्यात आले. मात्र तिला तिथे दवाखान्यात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. शेवटी एका खासगी दवाखान्यात तीचा मृत्यू झाला. पायलचे वडील कैलास रेल्वे स्थानकातील कॅन्टीनमध्ये मॅनेजर आहेत.