जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रात भोंदूबाबांकडून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असताना जळगाव शहरातही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “तुमच्यावर शनीची महादशा आहे, नुकसान होईल” अशी भीती दाखवत दोन भामट्यांनी एका वृद्धाची साडेचार ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि ९०० रुपये लंपास केल्याची घटना शहरातील नवीन बसस्थानकातील पोलिस चौकीआड घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?
शहरातील जिल्हा बँक कॉलनी राहणारे गजानन विठोबा सर्जेराव (वय ६७) हे २० एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकावर मुलीकडे जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबले होते. बसस्थानकातील बंद असलेल्या पोलिस चौकीच्या आडोशाला दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी सर्जेराव यांना गाठून त्यांच्या अंगावर शनी असल्याचे सांगून भीती घातली. आम्ही तुमचा शनी काढून देतो असा विश्वास संपादन केला. यानंतर भामट्यांनी त्यांच्या हातातील ४.५ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि 900 रुपये घेऊन दोघेही पसार झाले.

घटनेदरम्यान एका भामट्याने रस्त्यावरचा खडा उचलण्यास सांगितला आणि तीन वेळा “राम राम राम” म्हणत मूठ उघडताच खड्याऐवजी रुद्राक्ष असल्याचे दाखवले. या हातचलाखीने सर्जेराव यांचा विश्वास बसला आणि त्यांनी पुढील ‘पूजा’ करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे अंगठी व पैसे काढून दिले.
भोंदूबाबांनी सर्जेराव यांना बसस्थानकातील बंद पोलीस चौकीजवळ नेले आणि मागे न पाहता पुढे जाण्यास सांगितले. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले असता दोन्ही भामटे पसार झाल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे समजताच सर्जेराव यांनी तातडीने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात दोघांविरोधात पोलीस तपास करत आहेत.











