जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२५ । सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्विकारताना पारोळा वन विभागाच्या दोघा वनपालांना जळगाव एसीबीने रंगेहाथ पकडले. दिलीप भाईदास पाटील (वय ५२, मोंढाळे, ता. पारोळा रा. देवपूर धुळे) व वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (वय ३८, चोरवड, ता. पारोळा) अशी दोघा लाचखोर वनपालांची नावे आहेत. या प्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

याबाबत असे की, पारोळा तालुक्यातील एक व्यक्ती शेतात लावलेल्या सागाची वृक्ष खरेदी करण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी इंधवे शिवारातील एका शेतकऱ्यासोबत साठ हजार रूपयांचे सागवान लाकूड खरेदीसाठी व्यवहार केला होता. यासाठी वन खात्याकडून परवानगी मिळावी म्हणून त्यांनी रीतसर अर्ज केला होता. या प्रकरणात वनपाल दिलीप भाईदास पाटील आणि वनपाल वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड या दोन कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे आठ हजार रूपयांची मागणी केली होती.

याबाबत जळगाव एसीबीला १९ जून रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्या प्रमाणे पडताळणी केली असता दिलीप पाटील यांनी लाचेची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार २ जुलै रोजी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून वनपाल दिलीप पाटील यांच्या सांगण्यावरून वनपाल वैशाली गायकवाड पंचा समक्ष ८ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात मिळून आले. या प्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते
सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ सुरेश पाटील, मपोहेकॉ शैला धनगर, पोहेकॉ किशोर महाजन, पोकॉ राकेश दुसाने व पोकॉ अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.










