जळगाव लाईव्ह न्यूज । चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात फिरणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून विनाक्रमांकाची बजाज पल्सर मोटारसायकल जप्त केली असून, तपासादरम्यान ही मोटारसायकल शनीपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले.

दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस अंमलदार किरण वानवडे आणि प्रविण जाधव हे जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी कांताई नाट्यगृह परिसरात दोन इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कांताई नाट्यगृह परिसरात धाव घेतली. तेथे दोन इसम विनाक्रमांकाची बजाज पल्सर घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबवून मोटारसायकलबाबत कागदपत्रे आणि मालकी हक्काची माहिती विचारली. मात्र, दोघांनाही समाधानकारक माहिती देता आली नाही.
चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे मनोज दत्तू चौधरी (वय २४, रा. ज्ञानदेव नगर परिसर, जुना खेडी रोड, जमुना नगर, जळगाव) आणि सुमित शंकर चौधरी (वय ३१, रा. श्रीराम चौक, हरिओम नगर, जळगाव) अशी सांगितली. पोलिसांनी संशयितांकडील मोटारसायकलचा चेसीस आणि इंजिन क्रमांक तपासला. RTO अॅपवरून वाहनाची माहिती घेतल्यानंतर सदर मोटारसायकलचा नोंदणी क्रमांक MH-19-DY-7458 असल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी वाहनाच्या मालकाशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली. त्यावेळी सदर बजाज पल्सर चोरीस गेल्याचे आणि याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.चोरीची मोटारसायकल जप्त करून दोन्ही संशयितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी शनीपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.पोलीस अंमलदार किरण पंढरीनाथ वानवडे आणि प्रविण राजेंद्र जाधव यांनी ही कारवाई यशस्वी केली.





