जळगाव बस स्थानकात वृद्धाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; दोघे जेरबंद, तिसरा साथीदार फरार

मे 6, 2026 12:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव बसस्थानक परिसरात भोंदूगिरीच्या जोरावर ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांचे दागिने आणि पैसे लंपास करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला असून दोन जणांना अटक केली आहे. अल्ताफ हसन मदारी (वय ३२, रा. नगरदेवळा, ता. पाचोरा) व मोहसीन जब्बार मदारी (वय ३१, रा. चाळीसगाव) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

lutere

नेमकी घटना काय?

या घटनेबाबत असे की, जळगाव शहरातील जिल्हा बँक कॉलनीत राहणारे गजानन विठोबा सजेराव (वय ६५) हे काही कामानिमित्त २० एप्रिल २०२६ रोजी जळगाव बसस्थानक परिसरात आले होते. तिथे दोन अज्ञात भामट्यांनी त्यांना गाठले आणि बोलण्यात गुंतवले. “तुमच्यावर मोठा शनिदोष आहे, तो आम्ही काढून देतो,” असे सांगून भोंदूगिरीच्या साहाय्याने संमोहन करून त्यांनी वृद्ध गजानन सजेराव यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि जवळील रोख रक्कम काढून घेतली व तिथून पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गजानन सजेराव यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

बसस्थानक परिसरात सातत्याने घडणाऱ्या अशा चोऱ्यांमुळे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. एलसीबीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण तपासले. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा आणि चाळीसगाव येथे एकाच वेळी छापे टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या टोळीतील त्यांचा तिसरा साथीदार सद्दाम मदारी हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now