जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । मराठी नववर्षाचा पहिला दिवस साडेतीन मुहुतापैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याला देशात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्णनगरीतमध्ये सोन्याला दीडपटीने मागणी वाढली. या दिवशी १७५ हून अधिक फर्ममध्ये सुमारे २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तर गेल्यावर्षीपेक्षा यंदा कार विक्रीत दुप्पट वाढ झाली. गेल्यावर्षी २५० कारची विक्री झाली होती.यदां ५०० जणांनी कारचे स्वप्न पूर्ण केले. नवीन घरात राहायला जाण्यासाठी जे गृहप्रवेश केले जातात, त्यांची संख्याही या वर्षी दुप्पट होती. पण गेल्यावर्षी दुचाकी विक्रीची संख्या जी १५०० होती ती या वर्षी फक्त ८०० होती. इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये एसी, फ्रीज, मोबाइल विक्री २० टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी सोन्याच्या दागिन्यांसह कार, घर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी केल्याचं दिसून आले. यादिवशी जळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. रविवारी (३० मार्च) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन ते ८९ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर राहिले. तर, चांदीचे भाव एक लाख एक हजार रुपये प्रति किलोवर स्थिर राहिले. ऐन मुहूर्तावर सोन्याचे भाव काहीसे कमी झाल्याने ग्राहकांनीही खरेदीचा आनंद घेतला. किंमती वाढल्या असल्या तरी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असल्याचे प्रमुख ज्वेलर्सनी सांगितले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पारंपरिक दागिन्यांसह गुंतवणुकीसाठी सोन्याच्या कॉईनला ग्राहकांकडून पसंती मिळाली