
श्री तुळशी विवाह सोहळ्यानिमित्त आयोजन; हजारो भाविकांची ‘याची देही याची डोळा’ साक्ष
जळगाव लाईव्ह न्यूज । हिंदू संस्कृतीत श्री तुळशी विवाहाला परंपरागत अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री तुळशी मातेच्या विवाहानंतर वधू-वरांच्या ब्रम्हगाठी विवाह सोहळ्यांच्या रूपाने बांधल्या जातात. ही परंपरा कायमस्वरूपी टिकून राहावी, श्री मंगळग्रह मंदिरात येणाऱ्या विवाहेच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी परमेश्वराची विशेष आराधना करावी, या उद्देशातून मंगळग्रह सेवा संस्थेने अतिशय शुभ व परम पवित्र अशा त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त श्री तुळशी विवाह सोहळ्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू केली आहे. यंदाचे हे 15 वे वर्ष आहे.
मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 15 मिनिटे या शुभ मुहूर्तावर अतिशय भक्तिमय व मंगलमय वातावरणात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा हजारो वऱ्हाडींच्या रूपाने उपस्थित भाविकांच्या ‘याची देही याची डोळा’ साक्षीने वैदिक पद्धतीने पार पडला. सर्व प्रकारच्या खर्चिक बाबींना फाटा देऊन सनातन व साध्या पद्धतीने संस्कृतीबद्ध हा कार्यक्रम झाला. वर राजा भगवान श्री विष्णूजी यांचे मामा म्हणून पिळोदे (ता. अमळनेर, ह. मु. पुणे) येथील भटू प्रकाश शिंदे, तर वर राणी श्री लक्ष्मी माता यांचे मामा म्हणून अमळनेर येथील सुनील माणिक बिऱ्हाडे (ह. मु. जळगाव) यांनी भूमिका निभावली. या विवाह सोहळ्यानिमित्त सकाळी श्री मंगळग्रह देवांच्या महाआरतीनंतर दिवसभर मंदिर परिसरात भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.

तत्पूर्वी, वर राजा भगवान श्री विष्णूजी व वर राणी श्री लक्ष्मी माता यांची संबळ वाद्याच्या साथीने मंगलरथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेक भाविकांनी जल्लोषपूर्ण नृत्याचा आनंद घेतला. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव व प्रसाद भंडारी यांनी मुख्य पौरोहित्य करीत विधिवत मंगलाष्टके म्हटली. त्यांना पुरोहित जयेंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, अतुल जोशी, विनोद पाठक चंद्रकांत जोशी, उमेश पाठक, चेतन नाईक, प्रवीण भंडारी यांनी सहकार्य केले.
हा सोहळा यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुळकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, मंगल सेवेकरी सौ. आशाताई महाले, प्रकाश मेखा, विनोद कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण यांच्यासह मंदिराच्या सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

असंख्य माता-भगिनींच्या उपस्थितीत हळद, मेंदी कार्यक्रम
दरम्यान, श्री तुलसी विवाह सोहळ्यानिमित्त सोमवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 7.30 या वेळेत वर राजा भगवान श्री विष्णूजी व वधू राणी श्री लक्ष्मी माता यांच्या प्रतिकात्मक विवाहाच्या पूर्वसंध्येला संगीताच्या साथीने असंख्य माता-भगिनींच्या उपस्थितीत हळद, मेंदी कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाला. यावेळी माता-भगिनींनी नृत्य व फुगडी यांचा मनमुराद आनंद घेतला.
चाली, रूढी व परंपरांचे परिपूर्ण जतन
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे अत्यंत समाजाभिमुख व काळाची गरज असलेल्या एका उपक्रमास अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रारंभ केलेला आहे. त्या उपक्रमांतर्गत सर्वांना विवाह सोहळा पूर्णत: विधिवतरित्या आणि पैशांची उधळपट्टी न करता साधेपणाने करण्याची शपथ घेण्यासाठी सांगितले जाते. त्या शपथेच्या अनुषंगानेच मागील काही वर्षांपासून श्री तुळशी विवाह सोहळा अतिशय साधेपणाने मात्र पारंपरिक चाली, रूढी व परंपरांचे जतन करत हिंदी संस्कृतीप्रमाणेच केला जात आहे. त्यात भव्य सजावट आणि स्नेहभोजन यासाठी संस्थेतर्फे कोणताही खर्च केला जात नाही. देवांचा विवाह अत्यंत साधेपणाने मात्र पूर्णतः शास्त्रोक्त पद्धतीने केला जात आहे.





