डॉ.सी.व्ही.रमण यांना वंदन : सात शालेय विद्यार्थ्यांनी पाच दिवसांत साकारले शिल्प
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । येथील विद्या इंग्लिश स्कूलमधील सात विद्यार्थ्यांकडून विज्ञान दिनाचे औचित्य साधून डॉ.सी.व्ही.रमण यांचे शिल्प कोरण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी सहा इंच मातीच्या थरातून आठ बाय आठ फुटांचे सी.व्ही.रमण यांचे सुंदर शिल्प साकारण्यात आले.
कले विषयी प्रेम असलेले हर्षाली पाटील, जान्हवी पाटील, अनुष्का पाटील, सुमन सोनवणे, समीक्षा छाडीकर, चिन्मय विसपुते, केतकी सोनवणे या सात विद्यार्थ्यांनी नोबेल विजेते डॉ.सी.व्ही. रमण यांनी लावलेल्या शोधाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तथा २८ फेब्रुवारीला येणाऱ्या विज्ञान दिनानिमित्ताने शाळेत डॉ. रमण यांचे आठ बाय आठ फुटांचे शिल्प साकारले. या शिल्पामुळे शाळेतील आपल्या मित्रांनाही विज्ञानाची गाेडी लागावी या उद्देशाने त्यांनी हे शिल्प साकारले. या विद्यार्थ्यांना शिल्पासाठी कला शिक्षक कृष्णा सपकाळे, मुख्याध्यापक हॅरी जॉन, व्यवस्थापिका कामिनी भट यांचे मार्गदर्शन मिळाले.
विज्ञान दिनानिमित्ताने डॉ. रमण यांचे शिल्प कोरण्याचे ठरवल्यावर पूर्वतयारी म्हणून सर्वात आधी बारीक माती मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आली. त्यानंतर कागदावर पोर्टेट बनवण्यात आले. आठ बाय आठ फूट आकाराच्या ब्लॉकमध्ये सहा इंची थरात माती जमा करून काडीने हे शिल्प कोरण्यात आले आहे. मुलांना चित्रकला, शिल्पकला यात गोडी असल्याने सर्व कामे त्यांनी कला शिक्षक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:च केली.
समुद्रातील शिल्प पाहून प्रेरणा
समुद्र किनाऱ्यावर वाळूत महापुरुषांची शिल्पे तयार झालेली पाहण्यात आल्याने त्यापासून प्रेरणा घेत शाळेत एखाद्या महापुरुषाचे शिल्प तयार करण्याचे या मुलांनी ठरवले. विज्ञान दिवस जवळ येत असल्याने डॉ. रमण यांचे शिल्प तयार करण्याचे आमच्या ग्रुपने ठरले. यात आम्ही दररोज तीन ते चार तास शिल्पसाठी देत होतो. विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला हे शिल्प तयार झाल्याचे सांगितले.