⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ; वाचा काय घडले मराठा समाजाच्या आंदोलनात

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ सप्टेंबर २०२३ | जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागलं. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केल्याने हे आंदोलन चिघळलं. या लाठीमारावरुन विरोधकही आक्रमक असताना दुसरीकडे अंतरवाली सराटी येथे सुरु असलेले आंदोलन मनोज जरांगे पाटलांनी सुरुच ठेवलं आहे. याच पार्श्वभूमीवर, जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्री गिरीश महाजनांसह नितेश राणेंनी जरांगे पाटलांची भेट भेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपचा हा प्रयत्न निष्फळ ठरला असून मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

भाजप नेते गिरीश महाजन आणि आमदार निलेश राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरंगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र जरांगे पाटील त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. या बैठकीला चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण देखील उपस्थित होते. पोलिसांनी गोळीबार केल्याचा पुरावा जरांगे पाटलांनी भाजप नेत्यांना दिला. यावेळी पुरावा म्हणून काही बुलेट देखील त्यांनी दाखवल्या. पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

मराठा समाजाला दोन दिवसांत आरक्षण देऊ; पण ते न्यायालयात टिकणार नाही. शाश्वत आरक्षणासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी द्या, असा प्रस्ताव राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांपुढे ठेवला. मात्र उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी हा प्रस्ताव फेटाळत आपण उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले. अण्णा हजारे यांनी अनेक आंदोलने केली. आंदोलनानंतर त्यांनी शासनाला वेळ दिला. आम्ही एक महिन्याची वेळ मनोज जरांगे यांच्याकडे मागितली आहे. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असे महाजन यांनी सांगितले.

आता एक महिन्याचा वेळ देणार नाही. मराठवाड्यातील मराठा समाजाच्या कुणबी आरक्षणाचा प्रश्न दोन दिवसांत सोडवावा. उर्वरित महाराष्ट्रासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आता भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यात मराठा आरक्षण वगळता भरती होणार आहे. त्यामुळे आम्ही वेळ देणार नाही. मागास मराठवाड्यातील समाज बांधवांना तातडीने आरक्षण द्यावे. आम्ही चर्चा करायला तयार आहोत, चर्चेशिवाय प्रश्न सुटणार नाही. परंतु, शासनाने दोन दिवसांत आम्हाला निरोप द्यावा, असे उपोषणकर्ते मनोज जरांगे म्हणाले.

काय म्हणाले गिरीश महाजन ?
उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज करण्याची गरज नव्हती. मराठा समाजाला तात्काळ ओबीसीमध्ये घेता येणार नाही. पूर्वीच्या मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्याचे पुरावे शोधावे लागतील, कायद्याचा आधार घ्यावा लागेल. किंवा त्याशिवाय दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. यासाठी वेळ लागेल, असे गिरीश महाजन म्हणाले.

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे, यासाठी काही प्रक्रिया नसते. आमच्या पोरांवर गुन्हे दाखल केले. ते मागे घ्या. पोलिसांना निलंबित करा. आमचं पूर्वीचं आरक्षण आहे ते द्या, याला वेळेची आवश्यकता नाही. १ जून २००४ चा जीआर आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे. तो लागू करा, असे जरांगे पाटील म्हणाले. यावर गिरीश महाजन म्हणाले हे कोर्टात टिकणार नाही थोडा वेळ द्यावा. चर्चा करुन मार्ग काढावा लागेल.