⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

शोकांतिका : रस्ते खराब असल्याचे कारण देत नाकारला ‘स्वर्गरथ’

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रकाराने स्वतःला जळगावकर म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे. सत्तेच्या धुंदीत असलेले राजकारणी आणि मस्तवाल प्रशासनाच्या उन्मादपणाची फळे जळगावकरांना भोगावी लागत असून शहर दिवसेंदिवस मागे पडत असल्याची कुणालाही चिंता नाही. दोन दिवसांपूर्वी एका तरुणाच्या अंत्ययात्रेसाठी आवश्यक असलेला स्वर्गरथ चक्क त्या परिसरात खड्डे असल्याचे कारण देत नाकारण्यात आला. इतकंच नव्हे तर ‘तुम्हाला इतकी पडली असेल तर स्वतःचा स्वर्गरथ तयार करून घ्या’ असे उन्मदपणाचे उत्तर देखील त्या कर्मचाऱ्याने दिले.

जळगाव शहरातून विकास हा शब्दच हरवला असून सर्वत्र भकासपणा दिसत आहे. शहराच्या राजकारणात राज्याचे राजकारण चालविणारे अनेक दिग्गज नेते आजवर होऊन गेले आणि काही तर आजही लक्ष घालून आहेत. विद्यमान आणि आजी-माजी मनपा सदस्य देखील उच्च व्हिजन असलेले असतानाही केवळ बोलबच्चन देण्यातच राहत असल्याचे दिसते. शहरात आजवर मनपा स्वतःचे सुसज्ज रुग्णालय, सर्व सुविधा असलेले क्रीडांगण, ठिकठिकाणी उद्याने, उड्डाणपूल, चांगले रस्ते उभारू शकली नाही. त्यातच भर म्हणून काय गेल्या दोन वर्षांपासून तर शहराच्या रस्त्यांची पार चाळणी झाली आहे. निधी, अमृत योजना आणि भूमिगत गटारीच्या नावाखाली केवळ चालढकल सुरु आहे.

शहरातील प्रेमनगरात राहणाऱ्या स्वप्नील भालेराव या तरुणाचे दोन दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. मित्राच्या अंत्ययात्रेसाठी स्वप्नील शेटे आणि काही मित्र स्वर्गरथ घेण्यासाठी सिंधी कॉलनीतील नेत्रज्योती हॉस्पिटलजवळ गेले. त्याठिकाणी उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे विचारणा केल्यावर त्याने प्रेमनगरचा पत्ता ऐकताच ‘तिकडे खड्डे जास्त असल्याने आम्ही येत नसल्याचे उत्तर दिले’. स्वप्नील शेटे यांनी त्यास विचारणा केली असता शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने ‘तुम्हाला इतकीच काळजी वाटत असेल तर स्वतःचा स्वर्गरथ खरेदी करा’ असा सल्लाच दिला. काही वेळ प्रतीक्षा केल्यावर सर्व परतले. सर्वांनी घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.

मित्राची अंत्ययात्रा महत्वाची असल्याने वाद न घालता स्वप्नील शेटे यांनी उद्धटपणे उत्तर देणाऱ्या व्यक्तीचा पत्ता विचारत त्यास ‘आम्ही तर जुन्या गावात राहतो खांद्यावर पण स्मशानात जाऊ पण तू रामेश्वर कॉलनीत राहतो, उद्या तुझावर नको स्वतःचा स्वर्गरथ तयार करण्याची वेळ येवो’ असा टोमणा लगावला. स्वप्नील शेटे यांनी स्वर्गरबाबत सामाजिक कार्यकर्ते मोहन तिवारी यांच्याशी संपर्क केला. तिवारी यांनी जैन इरिगेशन, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनसोबत संपर्क साधला असता त्यांनी लागलीच स्वर्गरथ उपलब्ध करून दिला. स्वर्गरथातून घेऊन जात नेरीनाका स्मशानभूमीत स्वप्नील भालेराववर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जळगावकरांच्या सहनशक्तीला जगभरातून दाद द्यायला हवी. गेल्या अनेक वर्षांपासून जळगावकर निमूटपणे असुविधांचा बोजवारा सहन करीत असून गेल्या दोन वर्षात तर कुणीही आवाज उठवला नाही. त्यात मनपाकडून नव्याने मूल्यांकन करून कर आकारणी केली जाणार आहे. जळगाव मनपाच्या महासभेत त्यावर काही निर्णय होणार होता परंतु नगरसेवकांच्या गोंधळाने तो प्रश्न देखील बारगळला. जळगाव शहरात केवळ खड्डे असल्याने स्वर्गरथ नाकारण्यात येतो यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते. जळगावकर नागरिकांना केव्हा जाग येणार आणि ते आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतील? याचे उत्तर तर येणारा काळच देऊ शकतो.