⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

सागर पार्क मैदानावर उभारले जाणार अत्याधुनिक स्वच्छतागृह ; महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । ‘सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सागर पार्कवर सुप्रिम फाऊंडेशनच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत महिला व पुरुषांसाठी अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. या कामाचे महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते विधिवत मंत्रघोष व वाद्याच्या निनादात श्रीफळ वाढवून भूमिपूजन झाले. येत्या साडेतीन महिन्यांत हे काम पूर्णत्वास येणार आहे. ‘सुप्रिम इंडस्ट्रीज’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री.संजय प्रभुदेसाई, श्री.जी.के. सक्सेना, उपमहापौर मा.श्री.कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी, उपायुक्त श्री.पवन पाटील, माजी महापौर श्री.नितीन लढ्ढा, श्री.विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख श्री.शरद तायडे, नगरसेवक श्री.नितीन बरडे, श्री.अनंत (बंटी) जोशी, श्री.कैलास सोनवणे, श्री.प्रशांत नाईक, अ‍ॅड.शुचिता हाडा, सौ.दीपमाला काळे, सौ.सरिता माळी-कोल्हे, आर्किटेक्ट श्री.शिरीष बर्वे, महापालिकेचे शहर अभियंता श्री.अरविंद भोसले, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी माजी महापौर नितीन लढ्ढा मनोगतात म्हणाले, की सागर पार्क हा शहरवासीयांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. त्या अनुषंगाने येथे उभारल्या जाणार्‍या अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. या प्रकल्पाचे काम उत्तमप्रतीचे व अतिशय आधुनिकपूर्ण सेवा-सुविधांयुक्त होईल, अशी खात्री आहे. यापूर्वी फुले मार्केटनजीक जुन्या महापालिकेच्या जागेवरील सार्वजनिक शौचालय उभारले गेलेले असून ते उत्तम पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पासाठी काहीही अडचणी असल्यास जळगाव महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल.

प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक श्री.नितीन बरडे व श्री.अनंत (बंटी) जोशी या दोघांच्या पुढाकाराने व विशेष पाठपुराव्याने या कार्याला सुरुवात झाली आहे. यावेळी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी ‘सुप्रिम’चे आभार मानत जळगाव शहराला दात्यांची परंपरा नेहमीच राहिलेली असून, वेळोवेळी दानशूर व्यक्तींसोबत महापालिका समाजोभिमुख कार्य करण्यास तत्पर असते, असेही सांगितले.

सुप्रिम इंडस्ट्रीजचे महाव्यवस्थापक प्रभुदेसाई म्हणाले, की सामाजिक दायित्वातून काम करण्याची नेहमीच सुप्रिम फाऊंडेशनची आजवर भूमिका राहिली आहे. संबंधित काम साडेतीन महिन्यांत पूर्णत्वास येईल. तसेच पुढील टप्प्यात रामदास कॉलनी व शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. सदरील कामे नुसतीच पूर्णत्वास आणणे आमचा हेतू नाही, तर त्यांची देखभालही तितकीच तन्मयतेने आम्ही करीत असतो. या अनुषंगाने अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून मिळणारे आशीर्वाद आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरणारे असतात. महापालिकेचे सहकार्यही आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.