⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

वृद्धांना लबाडीने लुटणारा टिपू मन्यार एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वृद्ध नागरिकांना हेरत गोड बोलून त्यांना दुचाकीवर बसवून लुटण्याच्या घटना घडत होत्या. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहिती करून इब्राहिम उर्फ टिपू सत्तार मन्यार वय-३० रा.बाहेरपुरा, वराडसिम ता.भुसावळ याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याने काही गुन्ह्यांची कबुली दिली असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वृद्धांना लुटण्याचे प्रकार सुरु होते. दुचाकीवर येणारा एक इसम वृद्धांच्याजवळ येत पुढे सोडून देण्याचा बहाणा करीत होता. काहीतरी कारण सांगून वृद्धांकडील पैसे, दागिने घेत तो पोबारा करीत होता. जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत २४ हजारांची सोन्याची अंगठी, ९ हजार ५०० रुपये, फैजपूर पोस्टे हद्दीत ९९ हजार ९०० रुपये, शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत ४६ हजार रुपये लुटल्याचा गुन्हा दाखल आहे. जिल्हाभरातील पोलीस त्या आरोपीला शोधण्याचा प्रयत्न करीत होते.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांच्या पथकातील कर्मचारी पोलीस नाईक विकास सातदिवे, सुधीर साळवे, हेमंत कळसकर हे गेल्या तीन महिन्यांपासून आरोपीने गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीची माहिती काढत होते. तसेच ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज शोधून आरोपीचा शोध घेणे सुरु होते. विशेष पथकाला माहिती मिळाल्यावर गुन्हे करणारा इसम इब्राहिम उर्फ टिपू सत्तार मन्यार वय-३०, रा.बाहेरपुरा वराडसिम, ता.भुसावळ हा असल्याचे समजले. विशेष पथकाने दि.१० मार्च रोजी मध्यरात्री सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत टिपू मन्यार याने चार गुन्ह्यांची कबुली दिली असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सदर कार्यवाही एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, मिलिंद सोनवणे, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, इम्रान सैय्यद, योगेश बारी, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील आदींनी केली आहे.