जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२६ । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने आज २८ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण राज्यात ‘शासकीय सुट्टी’ आणि ‘राजकीय दुखवटा’ जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.

या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे आज बुधवार राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे. शासनाकडून आयोजित केलेले आजचे सर्व करमणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आहेत.












