जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२५ । चाळीसगावच्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड घाटात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वनरक्षकाच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. दरम्यान याचा तपास करत दाखल मिसिंग तक्रारीतील युवक असल्याचे समोर आले आहे. मात्र या तरुणाचा त्याच्या मित्रांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्ताने बोलावून घातपात केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

धुळे तालुक्यातील मोर्दड गावातील जगदीश ठाकरे हा २९ जूनला घरी जेवण करत असताना त्याच्या दोन मित्रांनी त्याला आपल्याला वाढदिवसासाठी जायचे आहे असे सांगत बोलावले. यानंतर जगदीश ठाकरे हा जेवण न करताच मित्रांसोबत निघून गेला. मात्र तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. यातच कन्नड घाट परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.

२ जुलैला चाळीसगाव रोड पोलिसांनी एक अज्ञात मृतदेह कन्नड घाटामध्ये आढळून आला असल्याची माहिती जगदीशच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर या मृतदेहाची शहानिशा करताना त्याच्या अंगावर असलेल्या टॅटूमुळे मृतदेह जगदीश याचाच असल्याचे स्पष्ट झाले. जगदीश ठाकरे याला गोळी मारून त्याचा घातपात करण्यात आल्याचे प्रथमदर्शी आढळून आले आहे. या प्रकरणी तिघा जणांना चाळीसगाव रोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामागील मास्टरमाइंड कोण? याचा तपास सुरु आहे.
दरम्यान धुळे तालुक्यातील मोर्दड गावातील जगदीशचा घातपात झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कुटुंबीय तसेच तंट्यामामा भिल आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने हत्येमागील मूळ आरोपीस ताब्यात घेण्यात यावे; अशी मागणी करण्यात आली आहे. मूळ आरोपीस ताब्यात घेण्यात आले नाही; तर संघटनेच्या माध्यमातून जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व नातेवाईकांनी दिला आहे.











