जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२४ । जळगाव प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यावर्षी भात, कापूस, सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडळामधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. येणाऱ्या उत्पादनास ४० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास ६० टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.
विमा योजनेत समाविष्ट पिके खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या १४ पिकांसाठी, अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना यात भाग घेता येईल. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणीत करावी. आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे, उदाहरणार्थ शासकीय जमीन, अकृषक जमीन, कंपनी, संस्था, मंदिर, मशीद यांची जमिनीवर विमा काढल्यास त्याची अत्यंत गंभीर दाखल घेतली जाईल. एक रुपया भरून या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणे असावा. पीक विम्यातील नुकसान भरपाई केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बैंक खात्यामध्ये करण्यात येते