पित्ताशयातील खडे – गॉलब्लॅडर स्टोन्स : पित्ताशय काढायचे की फक्त खडे? : डॉ.रोहन पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । कुठल्याही रुग्णाच्या पित्ताशयात खडे आढळून आल्यास बऱ्याच वेळा त्याचे ऑपरेशन म्हणजेच सर्जरी करण्याचा सल्ला दिला जातो. ऑपरेशन त्याच रुग्णांचे करावे लागते ज्यांना त्या खड्यांपासून त्रास आहे किंवा संभाव्य धोका आहे. परंतु, एक नेहमीचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ऑपरेशन करताना फक्त खडे काढणार कि पित्ताशयच काढून टाकणार, तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, पित्ताशयातील खड्यांसाठी केल्या जाणाऱ्या ऑपरेशनमध्ये पित्ताशयच काढले जाते. ज्या वेळी पित्ताशयातील एखादा खडा किंवा खडे खाली सरकून पित्ताच्या नळीत अडकून बसतात आणि गुंतागुंत निर्माण होते, त्या वेळी इआरसीपी (ERCP) प्रक्रियेद्वारे फक्त खडे काढले जातात, परंतु ह्या रुग्णांमध्ये देखील नंतर पित्ताशय काढण्यात येते. आजवर ज्याही रुग्णांची पित्ताशयातील खड्यांसाठी शस्त्रक्रिया झालेली आहे, जवळपास त्या सर्व रुग्णांचे पित्ताशय काढलेले आहे. म्हणून जर तुम्हाला पित्ताशयातील खड्यांचा त्रास असेल तर पित्ताशय काढून टाकणे हाच एकमेव पर्याय आहे.
आता पुढील प्रश्न असा की, पित्ताशय काढून टाकले तर पचनसंस्था कशी काम करेल ? किंवा पित्ताशयच नसेल तर पित्त कुठून येणार? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, पित्ताशय म्हणजे पित्त आणि आशय, जिथे पित्त साठविले जाते अशी पिशवी, ज्याचे काम पित्त बनविणे नसून अतिरिक्त पित्त साठवणे आहे. पित्त म्हणजेच बाईल (BILE) हा चरबीयुक्त किंवा दुग्धजन्य पदार्थ पचविण्यासाठी लागणारा घटक आहे. पित्त तयार करण्याचे काम लिव्हर (काळीज) निरंतरपणे करीत असते. लिव्हरमधून तयार होणारे पित्त हे उजव्या आणि डाव्या अशा दोन नलिकांद्वारे लिव्हरमधून बाहेर येते. या दोन्ही नलिका (Right & Left Hepatict Duct) पुढे एकत्र येऊन एकच नलिका (Common Hepatict Duct) तयार होते. याच नलिकेला पित्ताशय येवून मिळते व तिथून पुढे पित्ताची नलिका (Common Bile Duct- CBD) तयार होते. आणि हीच नलिका छोट्या आतड्याला जावून मिळते.
ज्या वेळी आपण उपाशी असतो, किंवा पित्ताची गरज नसते, तेव्हा अतिरिक्त पित्त हे पित्ताशयात साठवून ठेवले जाते व जेव्हा चरबीयुक्त पदार्थ आतड्यात येतात, तेव्हा पित्ताशय त्यातील साठवलेले पित्त आतड्याकडे लोटत असते. या प्रक्रिये दरम्यान जर पित्ताशयात खडे असतील तर ते खडे पित्ताशयाच्या तोंडाशी येवून अडकू शकतात किंवा खाली पित्ताच्या नलिकेमध्ये (CBD) अडकू शकतात. ज्यातून रुग्णाला गंभीर व जीवघेण्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.
जर अशा रुग्णांचे पित्ताशय काढले तर हे संभाव्य धोके टाळता येवू शकतात. तसेच वारंवार त्रास देणाऱ्या पित्ताशयाच्या आजारातून सुटका करून घेता येते. पित्ताशय काढल्यानंतर पित्त साठविण्याची प्रक्रिया ही पित्ताच्या नलिकेत होत असते. पित्ताची नलिका जी साधारणत: ३ ते ४ मि.मि. जाड असते. ती पित्ताशय काढल्यानंतर ७ ते ८ मि.मि. पर्यंत फुगते. त्यामुळे रुग्णाच्या पित्त बनविण्याच्या किंवा साठविण्याच्या प्रक्रियेत कुठलीही अडचण येत नाही. जर फक्त पित्ताशयातील खडे काढण्याची शस्त्रक्रिया केलीच तर त्या पित्ताशयात पुन्हा खडे तयार होवून गंभीर धोके निर्माण होवू शकतात. त्यामुळे पित्ताशयाच्या खड्यांसाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेत पूर्ण पित्ताशयच काढले जाते.
जगभरात, पित्ताशयातील खडे हे जरी या शस्त्रक्रियेसाठीचे प्रमुख कारण असले तरी पित्ताशयातील गाठी, पित्ताशयाचे इफेक्शन, पित्ताशयाचा कॅन्सर, पचनसंस्थेचा कॅन्सर, पित्ताशयातील अनुवंशिक दोष अशा अनेक कारणांसाठी होणाऱ्या शस्त्रक्रियेत पित्ताशय काढले जात असते. ही शस्त्रक्रिया जगभरात दुर्बिणीद्वारे म्हणजेच लॅपरोस्कोपिक पध्दतीने केली जाते. ज्यात रुग्णाच्या पोटावर ५ ते १० मि.मि. चे छिद्र करून पित्ताशय काढले जाते. अगदी ३ वर्षापासून ते ८५ वर्षापर्यंतच्या रुग्णांचे पित्ताशय काढले गेलेले आहे आणि ते सर्व लोक सुदृढ जीवन जगत आहेत. या शस्त्रक्रियेत जरी पित्ताशय काढून टाकले तरी रुग्णाच्या पचन संस्थेत कुठलाही बदल होत नाही. म्हणून पित्ताशय काढण्याच्या शस्त्रक्रियेला घाबरून न जाता गरजेचे असेल तर ते काढून टाकणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
संकलन – डॉ.रोहन पाटील,
(लॅप्रोस्कोपी, कॅन्सर व जनरल सर्जन)
सहाय्यक प्राध्यापक, सर्जरी विभाग,
शासकीय वैद्यकीय महाविदयालय, जळगांव