⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

विशेष सहाय्य योजनांच्या मानधनात वाढ व कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी – डॉ.कमलाकर पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । राज्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निराधार,विधवा,असहाय्य,वयोवृद्ध,अंध,अपंग यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी सुरू असलेल्या मासिक अनुदान व निवृत्तीवेतन योजना व अर्जाच्या कार्यपध्दती यामध्ये सुधारणा व्हावी याबाबत जळगाव तालुक्यातील फुपनी येथील माजी सरपंच डॉ.कमलाकर पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवले आहे.तसेच निवेदनाची एक प्रत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना सादर केली आहे. निवेदन देतांना संदिप पाटील व इतर पदाधिकारी,नागरिक उपस्थित होते.

डॉ.कमलाकर पाटील यांनी विशेष सहाय्य योजनांच्या कार्यपद्धतीत पुढील प्रमाणे सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
१) महाराष्ट्र राज्यामध्ये विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सुरू असलेले संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ,विधवा,अपंग निवृत्तिवेतन योजना यांना दरमहा मिळत असलेले रु.१००० अनुदान/निवृत्तिवेतन हे रुपये रु.१५०० करण्यात यावे तसेच एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना रु.११०० व व दोन अपत्य असणाऱ्या रु.१२०० अर्थसाहाय्य देण्यात येते ते अनुक्रमे रु.१७०० व रु.१८०० करण्यात यावे. ही एक प्रमुख मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे.
२) शासनाच्या इतर योजना पाहता, या योजनेअंतर्गत देखील लाभार्थ्यांची वयोमर्यादा ६५ वर्षांवरून ६० वर्ष अशी करण्यात यावी कारण सेवानिवृत्ती वय हे साधारणतः सर्व दूर ५८ ते ६० वर्षे असेच आहे.
३) मागणी अर्जामध्ये रु.२१००० असलेली उत्पन्नाची मर्यादा ही रु.५०००० इतकी करण्यात यावी कारण रु.२१००० ही मर्यादा फार कालावधीपासून तशीच आहे व महागाईचा वाढता आलेख लक्षात घेता यामध्ये सुधारणा करणे अत्यावश्यक आहे.
४) उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयाप्रमाणे लाभार्थ्यांकडून दरवर्षी उत्पन्नाचा दाखल घ्यावा असे आदेशीत केले आहे,सदर लाभार्थी हे निराधार,विधवा,वयोवृद्ध,अंध,अपंग आहेत दरवर्षी उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी त्यांची मोठी फरफट होते यामुळे त्यांचा हा त्रास वाचावा यासाठी कृपया ही अट वगळण्यात यावी.
५) मुले वागवत नाही याबाबतचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात येऊन वयानुसार सदर लाभ देण्यात यावा कारण सदरील प्रमाणपत्र लिहून देताना सन्मान होत नाही वयोवृद्ध नागरिकांना विशेषतः महिलांना याबाबत संकोच व नैराश्याचा सामना करावा लागतो.
६) विधवा महिला लाभार्थ्याच्या मोठ्या मुलाचे वय २५ वर्ष पूर्ण झाल्यास व ते दारिद्रय रेषेखालील कुटुंब यादीत नसल्यास त्यांचे अनुदान बंद करण्यात येते ही वयाची व दारिद्र्य रेषेची जाचक अट तात्काळ बंद करण्यात येऊन विधवा लाभार्थ्यांना नियमितपणे सरसकट अर्थसाहाय्य लाभ देण्यात यावा.
७) सदरील योजनेच्या नावात कृपया सुधारणा करण्यात यावी व सदर योजनेमध्ये ‘सन्मान’ हा शब्द लावण्यात यावा (उदा. संजय गांधी निराधार ‘सन्मान’ योजना) असे संबोधण्यात यावे, कारण सर्व लाभार्थ्यांना सन्मानपूर्वक याचा लाभ मिळेल.
८) लाभार्थ्यांच्या मागणी अर्जामध्ये काही त्रुटी निघाल्यानंतर ते अर्ज अपात्र करण्यात येतात परंतु ते अर्ज अपात्र न करता सदर लाभार्थ्यास त्रुटी जोडण्याची संधी देऊन त्यावर स्वतंत्र बैठक घेण्यात यावी.
सदरील सर्व मागण्या ह्या अतिशय रास्त असून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची थेट संबंधित आहेत. या कारणास्तव वरील सुधारणा करणेविषयीचा शासन निर्णय निर्गमित व्हावा यासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांनी तात्काळ आदेशित करावे व सर्वसामान्यांना दिलासा देण्यात द्यावा ही विनंती देखील डॉ.कमलाकर पाटील यांनी केली आहे.