जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२२ । एकनाथ शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते आणि पश्चिम-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे हे अडचणीत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी एका महिलेने राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. आता याच महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाद मागितली आहे. त्यांनी एका पत्रात आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली असून माझी विनंती ऐकली नाही आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही तर आपल्यासमोर आयुष्य संपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही असे हि लिहिले आहे.

लग्नाचे आमिष दाखवून शेवाळे यांनी माझ्यावर अत्याचार केले असा आरोप या महिलेने केला आहे. शेवाळे यांचे लग्न झाले असल्याची कल्पना होती. मात्र, शेवाळे यांनी पत्नीसोबत वाद होत असून लवकरच तिच्यापासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावर आपण विश्वास ठेवला असे पत्रात लिहिले आहे. एका ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ आणि हे पत्र ट्विट करण्यात आले असून त्या खात्याची सत्यता पडताळून पाहण्यात येत आहे.

महिलेने ट्विटरवर हे पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. काही दिवसांपूर्वीच या महिलेविरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. एप्रिल महिन्यात या महिलेने खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. या महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. खासदार राहुल शेवाळे यांनी आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटले होते. राहुल शेवाळे यांनी १२ मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात संबंधित महिलेविरोधात दाद मागितली होती.
राहुल शेवाळे शिवसेनेच्या बंडखोर गटाचे लोकसभेतील नवे गटनेते
दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा केल्यानंतर लोकसभेतील बंडखोर शिवसेना खासदारांनी आपला वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. शिंदे गटाकडून मंगळवारी तसे पत्र लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना देण्यात आले. राहुल शेवाळे हे या गटाचे नेते असतील. त्यांनीच हे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले.












