जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून शहराजवळील ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रसिद्ध म्हाळसादेवी मंदिरात अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्याने मंदिराच्या दानपेटीतील रोकड आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरीचा हा संपूर्ण थरार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना रात्रीच्या सुमारास घडली. मंदिराच्या मागील बाजूने येत चोरट्याने खिडकीची लोखंडी जाळी अत्यंत शिताफीने कापली. त्यानंतर खिडकी वाटे मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्यात प्रवेश केला. चोरट्याने थेट देवीच्या समोरील दानपेटीवर डल्ला मारत ती फोडली. दानपेटीत असलेली संपूर्ण रोख रक्कम आणि इतर मौल्यवान ऐवज घेऊन चोरटा पसार झाला.

सकाळी मंदिराचे कुलूप उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, त्यात एक संशयित व्यक्ती चोरी करताना स्पष्टपणे दिसून येत आहे. खिडकीची जाळी कापण्यापासून ते दानपेटी फोडण्यापर्यंतची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली असून, संशयित चोरट्याचा चेहराही अगदी स्पष्ट दिसत आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने म्हाळसादेवी मंदिरात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून चोरट्याचा माग काढण्यासाठी तातडीने श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्र फिरवली आहेत. भररस्त्यावरील मंदिरात झालेल्या या चोरीमुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, चोरट्याला तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.









