जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात घरफोडीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून याच दरम्यान, विमानतळ परिसरातील तारा बिझनेस पार्कमध्ये एका व्यावसायिकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १० लाख १२ हजार रुपयांच्या रोकडसह सुमारे १२ लाख १३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

विमानतळ जवळील कुसुंबा खुर्द भागातील तारा बिझनेस पार्कमध्ये मोईज अब्बास बोहरा (४८) हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराच्या तळमजल्यावर ‘रुबी पेंट’ नावाची फॅक्टरी असून वरच्या मजल्यावर ते कुटुंबासह राहतात. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या घरात नूतनीकरणाचे काम सुरू आहे. १० एप्रिल रोजी मोईज बोहरा दर्शनासाठी बऱ्हाणपूरला गेले होते, तर १३ एप्रिल रोजी त्यांचे संपूर्ण कुटुंबही खासगी वाहनाने बऱ्हाणपूरकडे रवाना झाले.
पहाटे परतल्यावर चोरी उघड
१५ एप्रिल रोजी पहाटे २:१५ वाजेच्या सुमारास बोहरा कुटुंब घरी परतले. यावेळी त्यांना घराच्या वरच्या मजल्याचा दरवाजा अर्धवट उघडा आणि कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करताच हॉलमधील तीन कपाटांचे लॉक तोडलेले असून सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले.
चोरट्यांनी कपाटातील लॉकरमधून १० लाख १२ हजार रुपयाची रोकड, १० ग्रॅमचे सोन्याचे ब्रासलेट, २१ ग्रॅमच्या ५ अंगठ्या, २८ ग्रॅमच्या सोन्या-चांदीच्या बांगड्या असा एकूण १२ लाख १३ हजार रुपयाचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी मोईज बोहरा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करत आहेत.











