साडेनऊ लाखांचा लकी ड्रॉ लागल्याची थाप मारून तरुणास गंडा
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । ‘तुम्हाला साडेनऊ लाख रुपयांचा लकी ड्रॉ लागला आहे, अटी-शर्तींची पूर्तता केल्यानंतर पैसे मिळतील. त्यासाठी साडेनऊ हजार रुपयांचा जीएसटी आधी भरावा लागेल’ अशी थाप मारून तरुणास ४३ हजार ४५० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
हेमंत गुलाब चौधरी (वय ३४, रा. एसएमआयटी कॉलेजजवळ, जळगाव) यांची फसवणूक झाली आहे. चौधरी यांना २८ जून रोजी दुपारी १ वाजता मोबाइलवर एक संदेश आला. याबाबत खात्री करण्यासाठी ९९०३७२८१६९ या क्रमांकावर फोन करण्याचे मेसेजमध्ये सांगितले. त्यानुसार, चौधरी यांनी फोन केला. त्यानंतर समोरून बोलणाऱ्या भामट्याने त्यांना विश्वासात घेऊन लकी ड्रॉ लागला आहे, जीएसटी भरा असे आमिष दिले. त्यानंतर चौधरी यांनी भामट्याने सांगितल्याप्रमाणे ८५२१५०९१९९ या मोबाइल क्रमांकावर दोन वेळा करून ४३ हजार ४५० रुपये पाठवले. सायंकाळी तुमच्या खात्यात साडेनऊ लाख रुपये जमा होतील, असे भामट्याने सांगितले; परंतु, चार दिवस उलटूनही पैसे जमा झाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अखेर चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फरवणुकीबाबत सविस्तर माहिती देऊन फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश भावसार तपास करीत आहे.