⁠ 
रविवार, मे 19, 2024

रेडक्रॉसचे कोरोना काळातील कार्य कौतुकास्पद : महापौर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । जळगाव शहराच्या नवनिर्वाचित महापौर जयश्रीताई महाजन यांनी  सामान्य रूग्णालया मार्फत रेडक्रॉस येथे सुरु असलेल्या लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली व नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अतिशय शिस्तबध्द नियोजन,  सोशल डीस्टन्सिंचे पालन करून बसण्याची सुविधा, चार रजिस्ट्रेशन टेबल,  अशा सर्व सोयी सुविधांसह दिवसभरात २५० ते ३०० नागरिक या लसीकरणाचा लाभ घेत आहेत. हे सर्व पाहून माननीय महापौर यांनी समाधान व्यक्त केले.

महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांनी रक्तपेढीला भेट देऊन रक्तपेढीची पाहणी केली. रक्तपेढीत असलेल्या सर्व अद्ययावत तंत्रज्ञानाची त्यांनी उत्सुकतेने माहिती करून घेतली.  रक्तपेढीच्या क्षेत्रातील सर्वात सुरक्षित असलेल्या नॅट हे तंत्रज्ञान जळगाव जिल्ह्यात रेडक्रॉसमध्ये असून आरोग्य क्षेत्रात खूप चांगले कार्य रेडक्रॉस रक्तकेंद्रामार्फत होत असल्याने महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांनी रेडक्रॉसच्या कार्यकारिणी मंडळाचे कौतुक केले.

रेमडीसिवीर हे इंजेक्शन कोरोन रुग्णांसाठी अतिशय महत्वाचे असून या इंजेक्शन ची किंमत ३००० ते ५४०० इतकी आहे. परंतु रुग्णांवर  पडत असलेल्या आर्थिक बोझाचा विचार करून  रेडक्रॉस संचलित केदारनाथ मेडिकल मार्फत रेमडीसिवीर हे करोना रुग्णांसाठी लागणारे महत्वाचे इंजेक्शन जळगाव जिल्ह्यात सर्वात अत्यल्प दारात म्हणजे फक्त ११५०/-  रुपयात  उपलब्ध करून दिले आहे.

यामुळे रुग्णांना आर्थिक फार मोठा आधार मिळत आहे. हीच खरी समाजसेवा  असून रेडक्रॉसच्या सामाजिक कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांनी दिले आणि केदारनाथ मेडिकलचे संचालक निरंजन पाटील व भानुदास नाईक  यांचा व रेडक्रॉसच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला.

महापौर पदाचा कार्यभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच रेडक्रॉसला भेट दिली.  या निमित्त रेडक्रॉसच्या वतीने सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, कार्यकारिणी सदस्य सुभाष सांखला, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा,  केदारनाथ मेडिकलचे संचालक भानुदास नाईक, निरंजन पाटील,  वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर सोनवणे हे उपस्थित होते.