⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

चांगल्या परताव्याचे आमिष देत महिला पोलिसाला गंडविले

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । सध्या दिवसेंदिवस फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. अशातच आता सेवानिवृत्त महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत देखील फसवणुकीची घटना घडलीय. दहिसर येथील कंपनीत मुदत ठेवीत पैसे ठेवल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे सांगून ३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप पिंप्राळा येथील सेवानिवृत्त महिला पोलिस कर्मचारी यांनी केला आहे. शांताबाई नामदेव कापरे (रा. दांडेकरनगर, पिंप्राळा) असे त्या सेवानिवृत्त महिला पोलिसाचे नाव आहे. याबाबत त्यांनी २५ जुलै रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिलेला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली नसल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

काय आहे प्रकरण?

शांताबाई कापरे यांनी दहिसर मुंबई येथील अथर्व फाेरयू इंफ्रा अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे संबंधितांनी त्यांना सांगितले. मुदत ठेवीत पैसे ठेवले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे व्याज मिळेल, असे कंपनीच्या गुणवत्तेविषयी त्यांनी वारंवार सांगितले. मुदत ठेवीत पैसे ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले व जबाबदारीवर पैसे ठेवा. पिंप्राळ्यातील रहिवासी आहोत. केव्हाही पैसे मागितले तर परत करू, असे प्रतिनिधी सांगायचे. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी कंपनीमध्ये ३ लाख ५० हजार रुपये पाच वर्षांत दाम दुप्पट होतील, असे सांगितल्याने २७ जुलै २०१५ रोजी नगदी दिले. त्याबाबत कंपनीचे प्रमाणपत्रही दिले. २७ जुलै २०२० पर्यंत पैसे दामदुप्पट होऊन मिळणे अपेक्षित होते.

घराच्या बांधकामासाठी त्यांच्याकडे मुदतपूर्व रकमेची मागणी केली. त्यावेळी ४० टक्के रक्कम कपात करून मिळेल. मुदत पूर्ण होऊ द्या नंतर पूर्ण रक्कम घ्या, असे म्हणून प्रतिनिधीने फोन ठेवून दिला. रक्कम घेण्याची मुदत पूर्ण झाल्यावर त्यांनी प्रतिनिधीला फोन लावला. त्यानंतर अद्याप त्यांनी फोन उचललेला नाही. संपर्क करण्यास टाळाटाळ करीत आहेत. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करून न्याय द्यावा, असे कापरे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे.

हे देखील वाचा :