जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात गत सप्टेंबर महिन्यात पावसाने धुमाकूळ घातल्याचं दिसून आले. पावसामुळे ढगाळ वातावरण राहिल्याने सूर्यदर्शन मोजकेच काही दिवस जळगावकरांना झाले. मात्र मागच्या काही दिवसापासून पावसाने उसंती घेतली तर दुसरीकडे सूर्य तापत असून जळगावकरांना दुपारच्या वेळेस ‘ऑक्टोबर हिट’चा अनुभव येत आहे. दरम्यान जळगावककरांना आजपासून पुढचे चार दिवस पहाटे आणि सकाळी थंड वातावरण असेल आणि दुपारी काहीसा उकाडा जाणवणार आहे.

उत्तर-पश्चिम भारतात सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) हवेचा थंड प्रवाह दक्षिणेकडे सरकतो आहे. या चक्रीय स्थितीमुळे थंड हवेचा शिरकाव मध्य भारतामध्ये होईल. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात आज ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पहाटे आणि सकाळी थंड वातावरण राहील तर दुपारी उकाडा जाणवेल. रात्रीच्या तापमानात देखल घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तापमानातही होणार घट?
मंगळवारी (दि.७) जळगावचे कमाल तापमान ३३ अंशावर तर किमान तापमान २२ अंशापर्यंत होते. तर आजपासून ११ ऑक्टोबर या कालावधीत किमान तापमानात ५ ते ८ अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता आहे. या काळात तापमान १६ ते १८ अंशांवर येवू शकते. हा बदला हिवाळ्याची चाहूल देणारा असेल. मात्र, दुपारच्या वेळी उकाडा जाणवेल. पहाटे थंडी जाणवेल. अर्थात रात्री व पहाटे थंडी तर दुपारी ऑक्टोबर हिटचा तडाखा अशी विषम स्थिती राहण्याची शक्यता आहे










